डॉक्टर हा कधीच सेवानिवृत्त होत नसल्यामुळे त्यांनी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजातील दीनदुबळ्या आणि एड्सग्रस्त बालकांसाठी काम करून समाजात सेवा द्यावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ओम केअर सेंटरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एड्सग्रस्त बालकांच्या मेळाव्यात डॉ. पोवार बोलत होते. कार्यक्रमाला राजे संग्रामसिंह भोसले, डॉ. बन्सोड, डॉ. मेघा गवरे, किशोर राठी उपस्थित होते. एड्सग्रस्त बालक आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या पालकांच्या अनेक समस्या असताना त्यांच्यासाठी काम करण्याची आज समाजात गरज आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत येत असलेल्या एआरटी सेंटरमध्ये विदर्भातील १८ हजार  एड्सग्रस्त उपचार घेत आहेत. समाजात एड्सग्रस्तांना दुय्यम वागणूक न देता त्यांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे.
यावेळी डॉ. राजे संग्रामसिंग भोसले यांचे भाषण झाले. यावेळी केंद्रातील एड्सग्रस्त बालकांना भेट वस्तू देण्यात आल्या. एड्सग्रस्त बालकांच्या पालकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.