एका अल्पवयीन शाळकरी मुलीला फूस लावून पळवून नेल्याबद्दल संतोष परमेश्वर कांबळे (वय २०, रा. शंकरनगर, शिवशाहीजवळ, होटगी रोड, सोलापूर) यास सोलापूरच्या सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
या खटल्याची पाश्र्वभूमी अशी की, शहरातील होटगी रस्त्यावरील शंकरनगर येथे राहणारी सदर पीडित मुलगी (वय १३) ही आपल्या घराजवळील प्रशालेत शिकत होती. परंतु घराजवळ राहणारा ओळखीचा संतोष कांबळे याने तिच्याशी ओळख वाढवून तिला फूस लावले. त्याच्या जाळ्यात सदर मुलगी सापडली. २४ नोव्हेंबर २०११ रोजी दुपारी संतोष याने सदर मुलीला तिच्या शाळेच्या आवारातून मोटारसायकलवर बसवून पळवून नेले होते. वर्गातील अन्य मुलींनी ही घटना समक्ष पाहिली होती. याबाबत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असता पोलिसांनी तपास करून आरोपी संतोष कांबळे यास अटक केली होती. त्याने सदर मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. तपासाअंती त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. यात सरकारतर्फे अॅड. माधुरी देशपांडे यांनी बाजू  मांडली. सदर पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा पुरावा महत्त्वाचा ठरला. मात्र बलात्कार केल्याचा वैद्यकीय पुरावा समोर आला नाही. त्यामुळे बलात्काराच्या आरोपातून आरोपी संतोष कांबळे यास मुक्त करण्यात आले. परंतु अपहरणाचा गुन्हा सिध्द झाल्याने त्यास सात वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली. आरोपीचा बचाव अॅड. भोसले यांनी केला.