कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, शहर परिसरात सुरू असलेल्या रस्ता, गटार दुरुस्ती वा तत्सम विकास कामांमुळे वाहतुकीचा बोजबारा उडाला आहे. काही ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याची दक्षता पोलीस घेत असले तरी काही रस्त्यांना मात्र कोणी वाली नसल्याचे दिसते. सातपूर येथे याच पध्दतीने शुक्रवारी अचानक रस्त्यावर खोदकाम सुरू झाल्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतुकीत कमालीचे अडथळे निर्माण झाले. स्थानिकांसह कामगार वर्गाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
सातपूर बस स्थानक परिसरात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयासह काही सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच माणसांची तसेच वाहनांची वर्दळ सातत्याने सुरू राहते. तसेच मुख्य सातपूर बस स्थानक समोरील बाजुस भाजी बाजारानजीक असलेल्या एका थांब्यावर खासगी वाहनांसह, राज्य परिवहन महा मंडळाच्या पालघर, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाणाऱ्या बसेस थांबतात. तसेच शहर बस वाहतुकीचा अशोकनगर, श्रमिकनगर, बेळगाव ढगा या ठिकाणी ये-जा करणाऱ्या बसचा थांबा आहे. शुक्रवारी सकाळी व्हिक्टर पॉईंट ते अंबिका हॉटेलपर्यंत एका बाजुने भूमीगत गटारी तसेच अन्य काही कामांसाठी रस्ता खोदण्याचे काम अचानक सुरू झाले. जेसीबीसह अन्य यंत्रसाम्रगी आणि मजूर दाखल झाल्यावर नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील एका बाजुची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. परिणामी जो रस्ता सुरू होता, त्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू झाली. रस्ता बंदची कुठलीच कल्पना नसल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडाला. शालेय विद्यार्थी व प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागली. यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला. कोंडीमुळे त्र्यंबकेश्वर व अन्यत्र जाणाऱ्या बसेस न थांबविणे चालकांनी पसंत केले. परिणाणी प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी परिसरात एकही वाहतूक पोलीस उपस्थित नव्हता.
खोदकाम करणाऱ्यांपैकी काही मजुरांनी आळीपाळीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. मात्र स्थितीत फारसा फरक पडला नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या बसेस तसेच शहर बस वाहतुकीच्या बसेसने कोंडी टाळण्यासाठी थेट पुढे मार्गस्थ होणे पसंत केले. याबाबत प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांना कल्पना नसल्याने त्यांचे हाल झाले. एकतर त्यांना बस सोडावी लागली नाहीतर पुढील थांब्यावर जावे लागले. यामुळे अनेकांच्या कामाला हजर होण्याची तसेच शाळेची वेळी चुकली.
 वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता किंवा वाहतूक पोलिसांची नेमणुक करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.