शिवसेना-भाजपा युतीच्या जागा वाटपात लोकसभेची शिर्डीची जागा शिवसेनेला सोडण्यात आली असून सेनेने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. येथून निवडणूक लढवण्यास रामदास आठवले तयार नसल्याने रिपब्लीकन पक्षाने या जागेवरील हक्क सोडून दिला आहे.
आठवले यांनी मागील निवडणूक शिर्डीतून लढविली होती. पण, त्यांचा पराभव झाला. जिल्ह्यातील नेत्यांनी पराभव घडवून आणल्यामुळे आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरची युती तोडून सेना-भाजपबरोबर घरोबा केला होता. आता आठवले यांनी शिर्डीतून निवडणूक न लढविण्याचे ठरविले असून त्यांनी लातूर किंवा मुंबईत सुरक्षित मतदारसंघ शोधण्यास प्रारंभ केला आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच अकोले तालुक्यात बैठक झाली. या बैठकीत शिर्डीची जागा आठवलेंसाठी सोडावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. तसेच बौद्ध उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी केली, पण आठवले यांनी मात्र कार्यकर्त्यांना अशी मागणी करू नये, असा सल्ला दिला. सेना-भाजपा युतीने आठवले यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतरच आपले उमेदवार जाहीर करावे, अशीही मागणी कार्यकर्त्यांची होती. पण, आठवले यांच्या आदेशामुळे कार्यकर्त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. आठवले यांनी खासदार वाक्चौरे यांच्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एकूणच जागा वाटपात शिर्डीच्या जागेचा तिढा राहणार नाही, असे सपष्ट झाले आहे.
शिर्डीची जागा मागील निवडणुकीत काँग्रेसच्या वाटय़ाला तर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली होती. आता जागेच्या अदलाबदलीची चर्चा सुरू झाली आहे. आज तरी या जागेवर काँग्रेसचा हक्क आहे.