सोनपेठ येथे ग्रामीण रुग्णालय व शेळगाव येथे प्राथमिक आरोग्यकेंद्रास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार मीरा रेंगे यांनी दिली.
ग्रामीण भागातील जनतेला ३० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक केंद्र व तालुक्याला ग्रामीण रुग्णालय देण्याचे धोरण असताना सोनपेठ तालुक्यात फक्त सोनपेठ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होते. त्यामुळे तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. परभणी येथील जिल्हा रुग्णालयामध्ये येथील रुग्णांना यावे लागत होते. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सोनपेठ येथे ग्रामीण रुग्णालय व शेळगाव (तालुका सोनपेठ) येथे प्राथमिक आरोग्यकेंद्र मंजूर करण्याची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात व आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या बृहत् आराखडा बैठकीत आमदार रेंगे यांनी केली होती. या मागणीनुसार सोनपेठ येथे ग्रामीण रुग्णालय व शेळगाव येथे प्राथमिक आरोग्यकेंद्रास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी आमदार रेंगे यांना पत्र पाठवून दिली.