मुंबईतील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित ‘सनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पत्रकार विजय जोशी निर्मित, गीत-संगीत-नृत्यावर आधारित हा कार्यक्रम नांदेडकरांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. उत्कृष्ट नियोजन, देशभक्तीपर नृत्ये व समूहगीतांमुळे कार्यक्रमात रंगत वाढली. नांदेड महापालिकेने याचे आयोजन केले होते. पत्रकार तथा गायक विजय जोशी यांचे नियोजन, तसेच अनंत पाटील यांच्या संगीत संयोजनाखाली आखणी केलेल्या या कार्यक्रमात भाग्यश्री देशपांडे (मुंबई), अनघा काळे (औरंगाबाद), आरती पाटणकर (औरंगाबाद) व अनुपमा पाटील (नांदेड), श्रीरंग चिंतेवार, भीमराव लोणे, विजय जोशी, अनंत पाटील या गायक कलावंतांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
नाद क्रिएशन्स ग्रुपने सादर केलेली नृत्ये, नांदेडच्या भरत जेठवानी या नृत्य कलावंतामार्फत उत्सव ग्रुपने सादर केलेले नृत्य आकर्षण ठरले. निवेदक अॅड. गजानन िपपरखेडे व प्रख्यात गझलकार बापू दासरी यांनी ‘२६/११’च्या स्मृती प्रभावी निवेदनातून जिवंत केल्या. राघवेंद्र कृट्टीचे व्हिज्युअल, संदेश हाटकर यांची नेपथ्य, वेशभूषा रचना यामुळे हा कार्यक्रम आणखीनच बहारदार ठरला. इतनी शक्ती हमे दे ना दाता, संदेसे आते हे, मेरा करमा तू, ये देश है वीर जवानोंका, जयोस्तुते, मराठी पाऊल पडते पुढे, हे िहदू नृसिंहा, साबरमती के संत, वंदे मातरम्, ए मेरे वतन के लोगो, देश मेरा रंगीला, म्यानातून उसळे अशा गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
महापालिका अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी सादर करेल. यातून देशभक्तीची भावना वृद्धिगंत होईल, असे महापौर अब्दुल सत्तार व आयुक्त जी. श्रीकांत यांनी या वेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव यांनी, जिल्ह्यातील ५ लाख देशभक्त पोलीस मित्रांनी चांगली भूमिका बजावली. जिल्हा शांततामय राहण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी धीरजकुमार, दिलीप स्वामी या वेळी उपस्थित होते. उपायुक्त विद्या गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.