दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी प्रस्थान करणाऱ्या संत निवृत्तिनाथ पालखीचे गुरुवारी सकाळी येथील निवृत्तिनाथ समाधी मंदिरात समाधीसह विधिवत पूजन करण्यात आले. यंदाच्या पालखीत सहभागी होणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र भाविक तसेच पालखी सोहळा याबद्दल त्र्यंबक पालिका तसेच जिल्हा प्रशासन उदासीन असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधांतरीच आहे.
पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या सोहळ्यास त्र्यंबक येथून संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी रवाना होते. गुरुवारी या पालखीचे भाविक तसेच समाधी मंदिर देवस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले. श्रींच्या चांदीच्या मुखवटय़ासह पादुका पालखीत निवृत्ती ज्ञानदेवांच्या जयघोषात ठेवण्यात आल्या. या वेळी कीर्तनकारांनी अभंगाचा गजर केला. थोडय़ा वेळाने पालखीचे त्र्यंबकेश्वर मंदिराकडे प्रस्थान झाले. कुशावर्तावर नगराध्यक्षा यशोदा अडसरे, सुनील अडसरे यांनी पादुकांचे पूजन केले. या वेळी पालिकेचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
भक्तांनी स्नानाचे अभंग म्हटले. तेथून त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी पालखी मेन रोडतर्फे आणण्यात आली. या वेळी पालखीसमवेत पंचक्रोशीसह मराठवाडा, नगर येथील भाविक पायी निघाले. यंदा मिरवणुकीत आकर्षक सजावटीसह १० नव्या पालख्या दाखल झाल्या. भाविकांची तसेच पालख्यांची वाढलेली संख्या पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने समाधी मंदिर संस्थानकडून प्रत्येक दिंडीला क्रमांक देण्यात आले
आहेत. शहरवासीयांनी दारापुढे सडासंमार्जन करून श्रींना औक्षण केले. शहरातील विविध रस्त्यांवरून निघालेल्या पालखीला जकात नाक्यावर निरोप देण्यास त्र्यंबकेश्वरवासीयांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, पालखीसमवेत भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या त्र्यंबक शाखेने औषध उपचार, रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. स्थानिक प्रशासनासह अन्य आस्थापनांनी त्याबद्दल अनास्था दाखवली. ज्ञानेश्वर माऊलीच्या सोहळ्याप्रमाणेच हा पालखी सोहळा व्हावा, ही भाविकांची रुखरुख आजही कायम राहिली.
पालखीसमवेत रामकृष्ण महाराज लहवितकर, निवृत्तिनाथ मंदिराचे पूजक गोसावी बंधू आदी कीर्तनकार सहभागी झाले. पालखी महिरावणी त्यानंतर सातपूर मुक्कामी
राहून शुक्रवारी नाशिक शहरात प्रवेश करील. जलतरण तलाव येथे पालखीचे महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी मुक्काम करीत आषाढी एकादशीस पालखी पंढरपूरला पोहचेल.