News Flash

संगमनेरकरांना प्रतीक्षा ‘बायपास’ची खुला होण्याआधीच भरावाला भलेमोठे तडे

संगमनेरचा बायपास कधी खुला होतो याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असतानाच एका पुलाजवळच्या भरावाला उदघाटनाआधीच तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय सुरक्षित प्रवासासाठी अधिक उपाययोजनाही

| January 11, 2014 02:00 am

संगमनेरचा बायपास कधी खुला होतो याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असतानाच एका पुलाजवळच्या भरावाला उदघाटनाआधीच तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय सुरक्षित प्रवासासाठी अधिक उपाययोजनाही करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शहरातून जाणा-या नाशिक-पुणे मार्गाला बाह्यवळण रस्ता व्हावा ही संगमनेरकरांची मागणी पूर्ण झाली आहे. मार्गावर प्रवरा नदीवर सर्वात मोठा पूल आहे. तेथील कामही जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी कधी खुला होतो याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. अनेक लोक उत्सुकतेपोटी रस्त्यावर फेरफटका मारायला जातात.
रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी एका भुयारी मार्गालगतच्या भरावाला उदघाटनापूर्वीच तडे गेल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. घुलेवाडी ते राजापूर, संगमनेर ते राजापूर, आणि संगमनेर अकोले येथे जाण्यासाठी बाह्यवळण मार्गाखालून भुयारी मार्ग करण्यात आले आहेत. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून कडेला सिमेंटच्या िभती उभारण्यात आल्या आहेत. घुलेवाडी राजापूर भुयारी मार्गाच्या भरावांना तडे गेले आहेत. सुरुवातीला फक्त चिरे दिसत होते, आता हे तडे चांगलेच खोल झाले आहेत. वाहतूक सुरू झाल्यास तेथे रस्ता खचण्याचीही भीती व्यक्त केली जाते.
अपघातविरहित रस्ता व्हावा यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्ता दुहेरी असला तरी त्याला दुभाजक अथवा बाजूला कठडेही नाहीत. अनेक ठिकाणी रस्ता जमिनीपासून पंधरा फुटांपर्यंत उंचीवरदेखील आहे. गुळगुळीत आणि विमानाच्या धावपट्टीप्रमाणे भासणा-या रस्त्यावर आपसूकच वाहने भरधाव वेगात जातील. वेगावर नियंत्रण राहिले नाहीतर कठडय़ांअभावी मोठे संकट उभे ठाकू शकते. संगमनेर-खांडगाव मार्गावर बाह्यवळण मार्ग जमिनीच्या पातळीत आल्याने तेथे चौफुला निर्माण झाला आहे. या दोन्ही मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असणार आहे, त्यामुळे या चौफुल्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वाधिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या तेथे केवळ पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. ते पुरेसे नाहीत. एकूणच बाह्यवळण मार्गाच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेऊनच तो खुला करावा अशी मागणी पुढे आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 2:00 am

Web Title: sangamner bypass damage before opening
टॅग : Damage,Opening
Next Stories
1 पत्नीच्या प्रियकराचा खून; मृतदेह विहिरीत टाकला
2 शहरासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फीडर
3 पशुबळी झाल्यास नव्या कायद्यानुसार कारवाई
Just Now!
X