शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयंत ससाणे यांचीच पुन्हा निवड होणार असून त्याबाबत कार्यकर्ते व इतरांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केले.
लोकमान्य टिळक वाचनालयाने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिका सुरू केली असून शुभारंभप्रसंगी कांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी बोरावके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के होते. माजी नगराध्यक्ष संजय फंड, उपनगराध्यक्ष दिलीप नागरे, शिक्षण मंडळाचे सभापती श्रीनिवास बिहाणी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार कांबळे म्हणाले, ससाणे यांनी १०० वर्षांचे शहराचे व तालुक्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे दुष्काळात एकही टँकर व जनावरांची छावणी सुरू करावी लागली नाही. मला त्यांनीच आमदार केले. सामान्य कार्यकर्ता आमदार करताना त्यांना आनंद झाला. दुसऱ्याच्या आनंदात सुख मानणारे खूप कमी आहेत. ससाणे हेच साईबाबा संस्थानचे अध्यक्ष होतील, त्यांनी केलेल्या कामाची दखल काँग्रेसने घेतली आहे, असे ते म्हणाले.
यावेळी प्रा. म्हस्के, सचिन गुजर, साजेब शेख, सागर कुदळे, संतोष जऱ्हाड यांची भाषणे झाली. प्रास्ताविक बिहाणी यांनी केले. आभार केतन औताडे यांनी मानले. यावेळी प्राचार्य लक्ष्मण भोर, टी. ई. शेळके, राजन भल्ला, बाबा दिघे आदी उपस्थित होते.