मंत्री गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन
तालुक्यातील महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या बचतगटांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी येथील बाजारतळावर उद्यापासुन (शुक्रवार) महिला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी ही माहिती दिली.
महिला व बालविकासमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते या तालुकास्तरीय महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ते तीन दिवस चालेल. कार्यक्रमास कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, उपायुक्त विजय गुजर आदी उपस्थित राहाणार
आहेत.
या महोत्सवासाठी येथील बाजारतळावर भव्य मंडप उभारण्यात आला असून, त्यात तालुक्यातील ५४ महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू विक्रीस ठेवण्यात येणार आहे. त्यात खाद्यपदार्थाचाही समावेश आहे. कृषि विभाग त्यात प्रदर्शन भरविणार आहे. सुवर्णजयंती शहरी व ग्रामीण स्वयंरोजगार योजना आणि राष्ट्रीय शहरी व ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत या महोत्सवाचे आयोजन केले आहे. राहाता पालिका, शिर्डी नगरपंचायत, राहाता पंचायत समिती, जनसेवा फौंडेशन लोणी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
शोभेच्या वस्तू, मेणबत्ती, सौंदर्य प्रसाधने, पिशव्या, संसारोपयोगी वस्तू, घोंगडी, पत्रावळी, द्रोण तसेच आवळा उत्पादने, हुरडा, चटण्या, लोणची, पुरणपोळी, चिक्की मांडे, वांग्याचे भरीत आदी खाद्यपदार्थ या महोत्सवाचे आकर्षण ठरेल.