२०१४-१५ शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होणार असल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची विशेष तपासणी मोहीम या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभागाकडून राबविण्यात येणार असून, वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झालेल्या शाळा व्यवस्थापनाच्या आणि खासगी कंत्राटदाराच्या मालकीच्या ६०२ शालेय बसेस आहेत, त्यापैकी १७५ बसेसचे योग्यता प्रमाणपत्र वैध नाही. परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे म्हणजे वाहनांची नोंदणी वैध नाही असे समजण्यात येते. त्यामुळे शाळा व्यवस्थापन, महविद्यालयीन संस्था, खासगी कंत्राटदार यांनी आपल्या मालकीच्या बसेसचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहने कार्यालयात सादर करावीत. त्यानंतरच विद्यार्थी वाहतुकीसाठी वाहने वापरावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या शालेय बस धोरणान्वये शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित ने-आण करणे, परिवहन शुल्क, बसथांबे निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेत एक परिवहन समिती गठित करणे आवश्यक आहे. समितीचे अध्यक्ष हे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक असतात. या समितीला वाहनांची कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, वाहनाचा परवाना, वाहनचालकाचा परवाना, वाहनातील अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी इ. तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्य़ातील सर्व शाळा, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यानी त्यांच्या शाळांमध्ये परिवहन समिती गठित करून प्रदान केलेल्या अधिकारांचा शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी वापर करावा, तसेच परिवहन समितीची बैठक तीन महिन्यांतून किमान एकदा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना कार्यालयातर्फे करण्यात आल्या आहेत.