एरवी दिवाळीच्या चार दिवस आधी सुरू होणारी शाळा आणि महाविद्यालयांची सुट्टी यंदा दिवाळीच्या अगदी तोंडावरच सुरू होत असल्याने शिक्षकांमध्ये, खासकरून महिला शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे.
यंदा शाळांची दिवाळीची सुट्टी धनत्रयोदशीपासून म्हणजे १ नोव्हेंबरपासून सुरू होते आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी आहे. एरवी ही सुट्टी दिवाळी सुरू होण्यापूर्वी चार-पाच दिवस आधीच सुरू होते. त्यामुळे, घरच्या साफसफाईपासून ते फराळ, खरेदी अशा दिवाळीशी संबंधित कामासाठी वेळ मिळतो. पण, या वर्षी दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत शाळा सुरू असल्याने शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. त्यामुळे, दिवाळीची सुट्टी थोडी अलीकडे, म्हणजे चार दिवस आधीपासून द्यावी, अशी मागणी शिक्षकांमध्ये जोर धरू लागली आहे.
‘माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२’नुसार शैक्षणिक वर्षांतील एकूण सुट्टय़ा ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. त्यानुसार कामाचे दिवस किमान २३० असणे बंधनकारक आहे. कामाच्या दिवसांबाबतचे नियम पाळले जावे यासाठी दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी म्हणजे एप्रिल महिन्यातच वर्षभरातील मोठय़ा सुट्टय़ांचे साधारण वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांकडून आखले जाते. यानुसार दिवाळीची सुट्टी १ ते १८ नोव्हेंबर अशी ठरवून देण्यात आली आहे.
‘आतापर्यंत २१ ते २२ दिवस असलेली दिवाळीची सुट्टी कमी करून यंदा १८ दिवस करण्यात आली आहे. पण, त्यापेक्षाही दिवाळी सुरू होता होताच सुट्टी सुरू होत असल्याने शिक्षकांची मोठी अडचण झाली आहे. शाळा ३१ ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार असल्याने दिवाळीची तयारी करण्यासाठी वेळच मिळणार नाही,’ अशी प्रतिक्रिया ‘शिक्षक लोकशाही आघाडी’चे राजेशकुमार पंडय़ा यांनी व्यक्त केली. एकतर शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे, शिक्षकांना अतिरिक्त कामाचा बोजा वाहावा लागतो आहे. त्यातून यंदा दिवाळीच्या सुट्टीचे नियोजनही फिस्कटणार आहे, अशा शब्दांत त्यांनी शिक्षकांची कैफियत मांडली. दिवाळीची सुट्टी काही दिवस आधीच सुरू करावी, अशी मागणी करणारे पत्र उपसंचालकांना लिहिण्याचा आपला विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाताळच्या सुट्टीला कात्री नाहीच
गणेशोत्सवात आयत्या वेळेस जाहीर करण्यात आलेली सुट्टी नाताळच्या सुट्टीला कात्री लावण्याऐवजी वर्षभरात कधीही भरून काढण्याची मुभा देण्यात आल्याने मुंबईतील इंग्रजी शाळांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गणपतीची सुट्टी नाताळच्या सुट्टीतून कमी करण्याचा आदेश महानगरपालिकेच्या शालेय शिक्षण विभागाने काढला होता. पण, अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्षा जेनेट डिसोझा यांच्या पुढाकाराने काही खिश्चन संस्थांबरोबर झालेल्या बैठकीत इंग्रजी शाळांना गणेशोत्सवासाठी दिलेली सुट्टी वर्षभरात कधीही देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे काही शाळांनी शनिवारी शाळा सुरू ठेवून सुट्टय़ा भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.