कळमनुरी उपविभाग निर्मितीबाबत राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना जारी केली. दि. १५ ऑगस्टपासून हे कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती आमदार राजीव सातव यांनी दिली.
जिल्हय़ात सध्या दोन उपविभाग असून हिंगोली उपविभागात कळमनुरी, सेनगाव तर वसमतमध्ये औंढा नागनाथचा समावेश आहे. उपविभाग निर्मिती, तसेच आखाडा बाळापूर तालुका व्हावा, यासाठी आमदार सातव यांनी प्रयत्न केले होते. उपविभागाची निर्मिती १५ ऑगस्टला होणार आहे. यानंतर आता आखाडा बाळापूर तालुका निर्मितीकडे लक्ष लागले आहे.
हिंगोली उपविभागात प्रशासकीय कामासाठी कळमनुरीतून येणाऱ्या जनतेला सुमारे ६५ किलोमीटर अंतर प्रवास करावा लागतो. प्रवासाचा वेळ व लागणाऱ्या खर्चामुळे विद्यार्थी व नागरिक हैराण होत. जनतेची ही अडचण दूर व्हावी, यासाठी कळमनुरी उपविभागाची मागणी लावून धरली. नवीन उपविभागात १५१ गावांचा समावेश होईल, असे सातव यांनी सांगितले.