शिवसेनेच्या सर्वच विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देणार असल्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठांकडून दिले गेल्यानंतर सेनेचे खासदार गणेश दुधगावकर यांच्या उमेदवारीला धोका नसल्याचा आशावाद त्यांचे हितचिंतक बाळगून आहेत, तर िशके तुटण्याची वाट पाहात असलेल्या सेनेतील लोकसभेच्या इच्छुकांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली.
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचे वेध सेनेतल्या इच्छुकांना लागले आहेत. विद्यमान खासदार दुधगावकर यांची उमेदवारी पक्षाकडून रद्द ठरवली जाईल, या अपेक्षेने सर्वच दावेदारांनी प्रयत्न चालविले आहेत. दुधगावकरांचा मतदारांशी संपर्क नाही, सेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी त्यांचा समन्वय नाही, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो. परभणीत सेनेची लोकसभेची उमेदवारी म्हणजे जिंकून येण्याची शंभर टक्के खात्री, असे आजवरचे समीकरण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज उमेदवारांच्या तुलनेत सेनेचे सर्वसामान्य चेहरेही मतदारांनी संसदेत पाठवले आहेत. माजी खासदार सुरेश जाधव, तुकाराम रेंगे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली, तेव्हा राजकीयदृष्टय़ा ते प्रबळ नव्हते, तरीही सेनेच्या मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांना धूळ चारत या दोघांना निवडून दिले.
गेल्या सलग ३ निवडणुकात माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा पराभव झाला. शिवसेना लोकसभा निवडणूक लढवते तेव्हापासून ही जागा सेनेने राखली. केवळ १९९८ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थापनेआधी वरपुडकरांचा अपवादात्मक विजय झाला. अशा स्थितीत परभणीची उमेदवारी म्हणजे सेनेतल्या सर्वच नेत्यांना ‘आधारकार्ड’ वाटू लागली आहे. आपापल्या विधानसभा मतदारसंघात ज्यांना असुरक्षित वाटत आहे त्यांना लोकसभा जास्त सोयीची वाटू लागली आहे. विधानसभा मतदारसंघातील किचकट जातीय समीकरणे हाताळण्यापेक्षा लोकसभेत लाटेवर निवडून येणे कधीही चांगले, असे सेनेच्या सर्व इच्छुकांना वाटते.
खासदार दुधगावकर यांची उमेदवारी रद्द झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून आपल्या नावाचा विचार होईल, या अपेक्षेने सेनेत अनेकांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. आमदार संजय जाधव, मीरा रेंगे, माजी आमदार हरिभाऊ लहाने, युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राहुल पाटील, सेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर हे पक्षातले दावेदार तर आहेतच, पण राष्ट्रवादीचे ‘उद्योगरत्न’ रत्नाकर गुट्टे हेही सेनेमार्फत उमेदवारीच्या प्रयत्नात आहेत. तीन आठवडय़ांपूर्वी पक्षाने जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बठक घेतली. या बठकीत सर्वाची मते स्वतंत्रपणे विचारात घेण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सेना नेत्यांच्या बठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. या बठकीत दुधगावकर यांची उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत दिले गेले. मात्र, या प्रकारामुळे सेनेच्या गोटात सध्या मोठी अस्वस्थता आहे. विशेषत सर्व दावेदारांनी पक्षातल्या आपापल्या ‘सूत्रां’ ना विचारून या वृत्तात किती तथ्य आहे याची खातरजमा करून घेतली. अजून तरी ठाम कोणतीही भूमिका पक्षाने घेतली नाही आणि निवडणुकांना अवकाश असताना असे काही आज घोषित करता येत नाही, असेही पक्षातर्फे सांगण्यात आले. दुधगावकर यांची उमेदवारी ठाम राहिलच, असे सांगता येत नसले तरी विद्यमान खासदारांना पुन्हा निवडणुकीत उतरविण्याच्या चच्रेमुळे सर्वच दावेदार अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान, सेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्येही मोठी अस्वस्थता असून लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळते की खासदार दुधगावकरच पुन्हा उमेदवार म्हणून निश्चित होतात, हा पेच सामान्य शिवसनिकांच्या तरी आकलनाबाहेरचा आहे.