माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात विद्यार्थ्यांमधील संगणकीय कौशल्याची कसोटी घेणा-या ‘सीड आयटीआयडल’ चा उपक्रम यंदा महाराष्ट्राची सीमा ओलांडून नवी दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यातही पोहोचणार आहे. उपक्रमाच्या कक्षा उत्तरोत्तर रूंदावत चालल्या असून यावर्षी तब्बल १ लाखाहून अधिक विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होतील, असे संकेत आहेत. भविष्यातील स्पर्धा परीक्षेसाठी सज्ज होण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद केवळ उत्साहवर्धक नाही तर वेगळ्या वाटा चोखाळण्यासाठी प्रोत्साहित करणाराही आहे.    
माहिती तंत्रज्ञानाचे विश्व द्रुतगतीने प्रसारत चालले आहे. अभियांत्रिकी, एमसीए, एमसीएस, एमसीएम आदी संगणक क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. माहिती तंत्रज्ञानाची जाण असल्याशिवाय नोक-यांमध्ये फारसे स्थान नसते याची जाणीव झाल्याने अन्य अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थीही संगणकाशी संबंधित कोणता ना कोणता अभ्यासक्रम पूर्ण करीत असतात. किंबहुना त्यातील अधिकाधिक प्रगत ज्ञान अवगत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तथापि, या विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञानाचा कितपत आवाका आहे याचा वेध घेण्यासाठी विद्यापीठ व खासगी शिक्षण संस्था यांच्या समन्वयाने ‘सीड आयटीआयडल’ या उपक्रमाचा प्रारंभ झाला. राज्यातील बहुतांशी विद्यापीठे व सीड इन्फोटेक यांच्यामार्फत राबविल्याजाणा-या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद वाढत चालला असून गतवर्षी या स्पर्धेत सुमारे ६० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.     
माहिती-तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम आणि नोकरीकरिता पारखून घेणा-या कंपनींची या संबंधातील प्रश्नावली यामध्ये चांगलेच अंतर असते. माहिती-तंत्रज्ञानामध्ये दर वर्षांला नवनवीन भर पडत चाललेली असते. पण विद्यापीठांचे अभ्यासक्रम तीन वर्षांने बदलले जात असल्याने नव्या बदलांचा समावेश अभ्यासक्रमात झालेला नसतो. उलट कंपन्यांना मात्र अद्ययावत ज्ञानाने युक्त असा विद्यार्थी त्यांच्या अस्थापनेसाठी हवा असतो. त्यामुळे अभ्यासक्रम आणि प्लेसमेंट यातील तफावत दूर करण्याचा आणि या योगे नोकरीचा मार्ग सुलभ करण्याचा दुवा या उपक्रमामुळे सांधला जातो. याचे फायदे लक्षात येऊ लागल्याने विद्यार्थी संगणकीय ज्ञानावरआधारित बहुपर्यायी प्रश्नावली असलेल्या परीक्षांना प्रतिसाद देताना दिसत आहेत.     
साठ प्रश्नांची व साठ मिनिटांची चाचणी परीक्षा पार केल्यानंतर विद्यार्थी वाढत्या काठीण्य पातळीच्या दुस-या परीक्षेला सामोरा जातो. त्यातून दहा अंतिम स्पर्धक निवडले जातात. त्यांना सर्वासमक्ष मंचावर बोलावून हॉटसीटवर बसविले जाते. यानंतर खास या स्पर्धेसाठी बनविण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली जाते. याचे कारण विद्यार्थ्यांना प्रश्नांचे उत्तर येत असते परंतु दबावाच्या वातारणातही त्याला ते देता यावे यासाठी केबीसाच्या धर्तीवर अशी स्पर्धा घेतली जाते, असे सीड इन्फोटेकच्या कार्यकारी संचालिका भारती बऱ्हाटे यांनी सांगितले. विजेत्या विद्यार्थ्यांना टॅबलेट, डिजिटल कॅमेरा, मोबाईल हँडसेट बक्षीस रूपाने दिले जाते.    
गेल्या चार वर्षांमध्ये राज्यातून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता हा उपक्रम महाराष्ट्राबाहेरही घेण्याचे निश्चित केले आहे. मध्यप्रदेश, नवी दिल्ली, कर्नाटक (बेंगलोर), राजस्थान (जयपूर)अशा काही भागांमध्ये यावर्षी सुरूवात होणार आहे. कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारले न जाणा-या या उपक्रमाच्या नोंदणीचे राज्यभरातील काम सुरू झाले असून ते १५ फेब्रुवारीपर्यंच चालणार आहे. दुसरी व अंतिम फेरी तसेच पुरस्कार वितरण समारंभ मार्चमध्ये होणार आहे. उपक्रमाचा विस्तार झाल्याने यावेळी लाखाहून अधिक विद्यार्थी यामध्ये समावेश होतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे. या उद्योगांमध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्याने परिपूर्ण असणे ही काळाची गरज आहे. उपक्रमाचा नेमका काय लाभ होतो याविषयी शिवाजी विद्यापीठाचे काउन्सेलर आणि प्लेसमेंट ऑफीसर प्रा.डॉ.पी.एन.भोसले यांनी सांगितले की, या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही कार्पोरेट विश्वासाठी आवश्यक असणारी देहबोली, व्यक्तिमत्त्व, भाषासंगती याचे आकलन होऊन प्लेसमेंटच्या वेळी त्याचा आत्मविश्वास उंचाविण्यास मदत होते. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाशिवाय अन्य ठिकाणी होणा-या उपक्रमांमध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांना विद्यापीठाकडून अर्थसहाय्यही केले जाणार आहे.