लोकसत्ताच्या वृत्ताने विद्यापीठात खळबळ
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या इतिहास पहिल्यांदाच झालेल्या शंभर उत्तर पत्रिका गहाळ प्रकरणाचे वृत्त लोकसत्ताने आज प्रकाशित केल्यानंतर विद्यापीठात चांगलीच खळबळ माजली. या उत्तरपत्रिकांचा शोध विद्यापीठ प्रशासन घेत असून हे प्रकरण दाबण्यासाठी विद्यापीठातील काही अधिकारी अग्रेसर असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात अधिक माहिती देण्यास कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.एम.भाले यांनी नकार दिला. चौकशी समितीच्या अहवालानंतर माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पूर्व आणि पश्चिम विदर्भातील प्रत्येकी एका खाजगी महाविद्यालयातील एकूण शंभर उत्तर पत्रिकांचा गठ्ठा गहाळ झाला आहे. हा गठ्ठा काहींनी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने गहाळ केल्याचा संशय विद्यापीठात व्यक्त केला जातो. शंभर उत्तर पत्रिकांचा गठ्ठा गहाळ होण्यात प्रक्रियेतील दोष स्पष्टपणे समोर येतात. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चौकशी समितीने त्यांचा अहवाल तात्काळ देण्याची गरज होती, पण तसे झाले नाही. तसेच विद्यापीठात इतकी गंभीर बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची गरज असतानाही अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही, तसेच या प्रकरणात पोलिसात तक्रारही करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकरणात परीक्षा विभागाच्या प्रमुखांवर तात्काळ कारवाई करण्याची गरज विद्यापीठात व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात दोन खाजगी महाविद्यालयातील बीएस.सी. कृषी या पदवीधर विद्यार्थ्यांचे कीटकशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. आता या शंभर परीक्षार्थीना त्यांच्या मागील कामगिरीवरून गुण दान केले जातील नाहीतर त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. याबाबतचा निर्णय विद्यापीठ स्तरावर प्रलंबित आहे. या सर्व घडामोडीत या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल अघोषित राहणार आहे. त्याचा सर्वच विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागेल. दरम्यान, या प्रकरणात कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.एम.भाले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी गहाळ उत्तर पत्रिकांचा शोध सुरू असल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणात विद्यापीठाच्या प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करून योग्य तो संदेश देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.