शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लांबलचक उड्डाणपुलाची संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या पुलाच्या सभोवतालचे रस्ते पाहिल्यास ते सव्‍‌र्हिस रोड आहेत की वाहनतळ, असा प्रश्न कोंडीतून कसाबसा मार्ग काढणाऱ्यांना पडला आहे. पंचवटीतील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाविद्यालयाने तर हा रस्ता म्हणजे आपल्या हक्काचा वाहनतळ बनविला आहे. द्वारका चौकात तशीच जागा टॅक्सी चालकांनी व्यापली असून त्यामुळे सव्‍‌र्हिस रोडवरून उड्डाणपुलाकडे जाणाऱ्यांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. शिवाय, टॅक्सी चालकांच्या अतिक्रमणामुळे द्वारका चौकात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते ते वेगळेच. द्वारका ते अमृतधामपर्यंत सव्‍‌र्हिस रोडवर गॅरेजच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या मालमोटारी व इतर वाहनांच्या जंजाळामुळे अनेक अपघातही होत असतात.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील पडणारा ताण लक्षात घेऊन उड्डाणपूल तसेच त्यालगत सव्‍‌र्हिस रोडची संकल्पना मांडण्यात आली. परंतु, सव्‍‌र्हिस रोडचे अवलोकन केल्यावर या रस्त्यावर वाहतुकीला अनेक ठिकाणी जागाच शिल्लक नसल्याचे लक्षात येते. सव्‍‌र्हिस रोड हे खास शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी विस्तारीत देखील करण्यात आले. परंतु, त्यांची बहुतांश जागा सध्या बेकायदेशीर वाहनतळ, मालमोटार दुरुस्तीचे गॅरेज यांच्यासह तत्सम छोटय़ा-मोठय़ा कारणांसाठी बळकावली गेली आहे. या सर्वाची परिणती, उपरोक्त सव्‍‌र्हीस रोडवर ठिकठिकाणी वाहतुकीचा बोजबारा उडण्यात झाली आहे. या रस्त्यावरील वाहतुकीने गंभीर स्वरुप धारण केले असले तरी वाहतूक पोलीस विभागाने त्याकडे कानाडोळा करण्याची भूमिका ठेवली आहे.
उड्डाण पूल प्रत्यक्षात आल्यावर द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर सहजपणे मार्ग निघेल ही अपेक्षा फोल ठरली. पण, या चौकातील वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे. कोणत्याही वेळी हा चौक पार करताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येते. या ठिकाणी उड्डाण पुलावर जाणाऱ्या मार्गाभोवती मालेगाव व धुळे येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी चालकांचा डेरा आहे. परिणामी, अन्य वाहनधारकांना पुलावर पोहोचणे अवघड बनले आहे. टॅक्सीच्या अनधिकृत तळाचा फटका द्वारका चौकातील वाहतुकीला काहीअंशी बसतो. सव्‍‌र्हिस रोडवरील अनेक भाग अनधिकृत वाहनतळांनी बळकावले आहे. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी, गॅरेज चालक व मालमोटारधारक, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस आदींचा समावेश आहे. पंचवटीतील महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित महाविद्यालयाने तर आपला संपूर्ण वाहनतळच जणू सव्‍‌र्हीस रोडवर हलविला आहे. या ठिकाणी थोड्या थोडक्या नव्हे तर ४०० ते ५०० दुचाकी थेट सव्‍‌र्हिस रोडवर दररोज उभी केली जातात.
याच परिसरातून नवीन आडगाव नाक्याकडे गेल्यास तिथे रिक्षा चालकांचा कब्जा आहे. सिग्नलवरील चौकालगत रिक्षांची भलीमोठी गर्दी असल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळे येत आहेत. सव्‍‌र्हीस रोडवरून तपोवनकडे जाणाऱ्या चौकातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. गॅरेजमालकांनी आपली दुकाने थेट या रस्त्यावर थाटली आहेत. दुरूस्तीसाठी उभ्या राहणाऱ्या असंख्य मालमोटारींमुळे सव्‍‌र्हीस रोड वाहतुकीसाठी आहे की वाहनतळ, दुरुस्ती कामांसाठी असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. सव्‍‌र्हिस रोडवरील वेगवेगळ्या अतिक्रमणांमुळे अन्य वाहनधारकांना मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. उड्डाणपुलावरून मार्गस्थ होता येत नाही आणि सव्‍‌र्हीस रोडवर जागा शिल्लक नाही अशा कोंडीत हे वाहनधारक सापडले आहेत.