माढय़ाचे खासदार तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे येत्या शनिवारी सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन तेथील पाणीपुरवठा, जनावरांच्या चारा छावण्या, सिमेंट बंधारे आदींची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी पंढरपुरात ते सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. रात्री त्यांचा मुक्काम पंढरपुरात राहणार आहे.
दि. १६ रोजी दुपारी रत्नागिरी येथून हेलिकॉप्टरने शरद पवार यांचे सांगोल्यात आगमन होणार आहे. सुधारित दौऱ्यानुसार पवार हे सांगोला तालुक्यातील जवळा व तरंगेवाडी येथे भेट देऊन तेथील सिमेंट बंधारे तसेच जनावरांच्या चारा छावण्यांची पाहणी करणार आहेत. नंतर वाणी चिंचाळे येथे टँकरचा पाणीपुरवठा तर लेंडवे चिंचाले (ता. मंगळवेढा) येथे सिमेंट बंधारे व चारा छावण्यांची पाहणी करून तेथील अडचणी जाणून घेतील.
सायंकाळी ६.३० वाजता पंढरपूर येथे जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत शरद पवार हे दुष्काळी परिस्थितीच्या आढाव्याबरोबर अडचणी समजून घेणार आहेत. संत तुकाराम भवनात ही बैठक होणार आहे. रात्री पवार हे पंढरपुरात मुक्काम करून रविवारी, दुसऱ्या दिवशी सकाळी हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होणार आहेत.