मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाले आणि प्रशासन यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी या फेरीवाल्यांना परवाना देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मुंबई हॉकर्स युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी ही मागणी केली.
फेरीचा धंदा करणाऱ्या सर्व फेरीवाल्यांना गेली अनेक वर्षे परवाना दिलेला नाही. त्या सर्वाना परवाने देऊन राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची पूर्तता करावी, असे आवाहन राव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिकेने मुंबईत राष्ट्रीय शहरी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पोलिसी बळाचा व पालिका कर्मचाऱ्यांचा वापर करून फेरीवाल्यांना विस्थापित करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
 मुंबई महापालिकेने राष्ट्रीय शहरी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न केल्यास शांततामय मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.