परभणी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात रात्रीची गस्त वाढवून परभणीकरांना भयमुक्त करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
बुधवारच्या रात्री परभणी शहरात चार ठिकाणी घरफोडय़ा झाल्या. चोरटय़ांच्या मारहाणीत एका साठ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेने परभणीत चोरटय़ांची दहशत पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले, असा आरोप शिवसेनेने निवेदनात केला आहे. चोऱ्यांसोबतच मुलींच्या छेडछाडीच्याही घटना वाढल्या आहेत. त्यामुळे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या पोशाखातील पोलीस शिकवणी व शाळा, महाविद्यालय या ठिकाणी नियुक्त करावेत, अशी मागणी करून रात्री साडेसात वाजेपर्यंतचे भारनियमन कमी करण्यात यावे, असे या निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, रामप्रसाद रणेर, अर्जुन सामाले, अनिल डहाळे, ज्ञानेश्वर पवार, व्यंकटेश मुरकुटे, नवनीत पाचपोर, उदय देशमुख, प्रल्हाद चव्हाण, संदीप भंडारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.