शालेय गणवेशाबाबत एकसूत्रता आणून कंत्राटदार व शिक्षण संस्थांचा गैरव्यवहार रोखण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या युवा सेना आघाडीच्या वतीने शुक्रवारी शिक्षण उपसंचालक व्ही. बी. पायमल यांना घेराव घालण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेनंतर पायमल यांनी गणवेशाची सक्ती कोणत्याही शाळेला केली नसल्याचे स्पष्ट करून तसे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांकरवी शिक्षण संस्थांना पाठविले असल्याचे स्पष्ट केले. तसेच गणवेशाबाबत शाळेकडून सक्ती होत असेल तर त्याच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरातील बहुतांशी शिक्षण संस्थांनी स्वत:चा गणवेश निश्चित केलेला आहे. शिवाय गणवेश विशिष्ठ दुकानातूनच खरेदी करावा अशी सक्ती केली जात आहे. यातून कंत्राटदार व शिक्षण संस्थांचे आर्थिक भले होत असल्याची चर्चाही आहे. या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी आणि तो रोखण्यात यावा याकरिता शुक्रवारी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली.
जिल्हा युवा अधिकारी हर्षल सुर्वे यांनी गणवेशातून राष्ट्रीय एकात्मता स्पष्ट होणे गरजेचे असल्याने सर्व शाळांसाठी एकाच प्रकाराचा गणवेश असावा या प्रकाराकडे त्यांनी लक्ष वेधले. पांढरा शर्ट, खाकी पॅण्ट-चड्डी व मुलींना पांढरा ब्लाऊज, निळा स्कर्ट किंवा चुडीदार असला पाहिजे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत संबंधित शाळांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. तसेच जनआंदोलनाद्वारे शिक्षण संस्थांना शिवसेना पध्दतीने धडा शिकविला जाईल असा इशारा सुर्वे यांनी दिला. या चर्चेत युवा सेनेचे शहर युवा अधिकारी अिजक्य चव्हाण, सागर पाटील, सचिन पाटील, अक्षय चाबुक, प्रदीप हांडे, संतोष चौगुले, योगेंद्र माने, प्रवीण पडवळ, अमित हंबे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.