जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे विरोधी सदस्यांच्या तक्रारीवरून पालकमंत्री जि. प.च्या कामात वारंवार हस्तक्षेप करतात. या पुढील काळात अशीच भूमिका घेतल्यास सेनेचे जि. प. सदस्य पालकमंत्री वर्षां गायकवाड यांना घेराव घालतील, असा इशारा जि.प.चे उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड यांनी दिला.
जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षाचे सदस्य अडवणुकीचे व विकासकामात अडथळे निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप गायकवाड यांनी पत्रकाद्वारे केला. सुरुवातीला विषय समित्या स्थापनेवेळी विरोधकांनी अडथळे आणले. तसेच दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामाची निवड सरकारने ठरविलेल्या निकषाप्रमाणे झाली.
पण या निवड यादीस पालकमंत्र्यांनी केवळ तोंडी आदेशाच्या आधारे २ महिने निधी वितरणास स्थगिती दिली. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली. एकीकडे विकासकामे संथ गतीने होत असल्याची ओरड व दुसरीकडे जलद मंजुरी दिलेल्या विकासकामांना स्थगिती, अशी दुटप्पी भूमिका विरोधी सदस्य राबवित असल्याचा आरोप त्यांनी केला.
 विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात जि. प. अध्यक्ष मीनाक्षी बोंढारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले.