मनाविरुद्ध घडल्यावर..आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी.इमारतीच्या गच्चीवर, पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’स्टाइल आंदोलन करण्याची युक्ती ही बऱ्याचदा यशस्वी ठरते. त्यामुळेच आपल्याला घरातून हुसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी पोलिसांकडे सातत्याने हेलपाटे मारूनही कोणी दाद देत नसल्याने, आपले घर वाचवण्यासाठी पाल्र्यातील महिलेने बुधवारी दुपारी भायखळय़ातील उंच जाहिरात होर्डिगवर चढत ‘शोले’स्टाइल आत्महत्येची धमकी दिली. अखेर बऱ्याच मिनतवाऱ्या करून तिला खाली आणण्यात पोलीस-अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. पण दुपारी साडेबारपासून अडीच-तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे भायखळा परिसरातील वाहतुकीचे मात्र तीन तेरा वाजले.
सपना परेरा या विलेपार्ले पश्चिमेला नेहरू नगर येथे एका चाळीत राहतात. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या मुलीसह भायखळय़ाजवळ आल्या. मुलीला त्यांनी टॅक्सीत बसवून परत पाठवले आणि जवळच्या जाहिरात होर्डिगवर चढण्यास सुरुवात केली. ते पाहून टॅक्सीत बसलेली मुलगी थांबली आणि उतरली. थोडय़ाच वेळात परेरा बाई होर्डिगच्या सांगाडय़ावरून थेट वरच्या टोकावर पोहोचल्या. ते पाहून लोकांची गर्दी जमू लागली.
जमलेल्यांनी ‘खाली उतरा.खाली उतरा’ असा पुकारा सुरू केला. पण बाईंनी त्यांना दाद दिली नाही. थोडय़ाच वेळात पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले. पण तरीही त्या बधल्या नाहीत. आपल्याला घरातून हुसकावण्यासाठी आणि त्यावर बळजबरी घराचा ताबा घेण्यासाठी स्थानिक गुंड त्रास देत आहेत..मला मारहाणही केली. पोलिसांत दाद मागायला गेले तर त्यांनी तक्रार नोंदवून घ्यायलाही नकार दिला. या अन्यायाविरोधात आता आत्महत्याच करणार..’ असा धोशा परेराबाईंनी लावला होता.
मुलीला पाहून तरी परेराबाई टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, खाली उतरतील या आशेने अग्निशमन दलाच्या क्रेनमधून मुलीला वर पाठवण्यात आले. मुलीनेही आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, खाली उतरण्यासाठी आर्जवे केली. पण परेराबाई ठाम होत्या.
अखेर दोन महिला व एक पुरुष पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी असे चौघे पुन्हा क्रेनमधून वर गेले, दुसऱ्या बाजूने सांगाडय़ावरून आणखी काही जवान वर चढले आणि बाईंजवळ पोहोचले. बऱ्याच विनवण्या केल्यावर..आरोपींवर कारवाई होईल, पोलीस लक्ष घालतील असे आश्वासन दिल्यावर सुमारे तीनच्या सुमारास बाईंनी उडी मारण्याचा निर्णय रद्द केला आणि क्रेनमधून न उतरता.चढल्या तशाच..म्हणजे होर्डिगच्या सांगाडय़ावरून त्या खाली आल्या. या जवळपास तीन तासांच्या नाटय़ात भायखळय़ातील वाहतुकीचे मात्र तीन तेरा वाजले.