डोंबिवलीतील पाथर्ली स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याने या स्मशानभूमीत मृतदेह घेऊन गेलेल्या नागरिकांना अन्य स्मशानभूमीत शव नेण्याची सूचना उपस्थित कर्मचाऱ्याकडून करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पाथर्ली स्मशानभूमीत गोग्रासवाडी, डोंबिवली जीमखाना, आजदे, एमआयडीसी निवासी, पेंडसेनगर, सावरकर रस्ता भागातून अंत्यविधीसाठी शव आणली जातात. काही दिवसांपासून या स्मशानभूमीत लाकडे नसल्याने नातेवाईकांना द्राविडीप्राणायाम करून शव दत्तनगर स्मशानभूमीत घेऊन जावे लागते. एमआयडीसीतील यशवंत तांडले (वय ५४) यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर त्यांना पाथर्ली स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी सायंकाळी सात वाजता नेले असता तेथे लाकडे नसल्याने नातेवाईकांना धावपळ करावी लागली. येथे लाकडे नाहीत. शव आणू नये, असे उपस्थित कर्मचाऱ्याने सांगितले. स्मशानभूमींसाठी लाखो रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. मग हा निधी जातो कोठे असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.