आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे २० नोव्हेंबर रोजी लोणार शहरात येत आहेत. मार्गदर्शनाचा कार्यक्रम मोठय़ा जनसमुदायाच्या उपस्थितीत व्हावा, यासाठी पदयात्रा काढण्यात आली. श्री श्री रविशंकर हे या महिन्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून, विदर्भात अकोला, लोणार, मराठवाडय़ात, सेलू, परभणी, पश्चिम महाराष्ट्र पुणे येथे येणार आहेत. त्यांचे  लोणार येथे २० नोव्हेंबरला १० वाजता येणार आहेत.   ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या सभामंडपाच्या जागेचे भूमिपूजन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी आरपीजी, हरीश पटेल, जयंत भोळे, डॉ. के.बी. मापारी, प्रकाशराव मापारी, बळीराम मापारी, निर्मल संचेती, रंगनाथ मोरे, राजेश मापारी, बाळासाहेब दराडे, बुगदाणे, रेदासणी, प्रकाश सानप, संतोष मापारी, प्रकाशराव पोफळे, राजगुरू, एस.बी. मापारी, अ‍ॅड. सुचित मोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, श्री श्री रविशंकरजी हे आध्यात्मिक गुरुजी आहेत. त्यांनी आपले शिष्य निर्माण न करता गुरुजी निर्माण केले आहेत. लोणार हे पूर्वीपासून पुण्यभूमी असल्याने आपले भाग्य की, ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. लोणार तपोभूमी आहे. मोठमोठय़ा ऋषीमुनींनी तप या भूमीत केले आहे, अशी नोंद इतिहासात तसेच अध्यात्मातही सापडतात. हा कार्यक्रम आपला आहे. तो शिस्तबद्ध आहे, चांगला झाला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी यावे यासाठी सर्वानी प्रयत्न करावा, असे ते म्हणाले.