मानव मंदिराच्यावतीने ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री स्मिता पाटील यांच्या नावाने रंगभूमी क्षेत्रात देण्यात येणारा २०१२ चा स्मिता पाटील पुरस्कार नाटय़ कलावंत विकास खुराणा यांना तर सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सुरेशचंद्र राठोर यांना जाहीर करण्यात आला आहे. अकरा हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अभिनेत्री स्मिता पाटील यांची रंगभूमी, चित्रपट आणि समाजाविषयी असलेली बांधिलकी बघता त्यांच्या स्मृतिनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून मानव मंदिरतर्फे रंगभूमी आणि सामाजिक अशा दोन क्षेत्रात पुरस्कार दिले जातात. यावर्षी रंगभूमीच्या क्षेत्रातील पुरस्कार विकास खुराणा यांनी प्रदान करण्यात येणार आहे. विकास खुराणा गेल्या अनेक वर्षांपासून इंग्रजी थिएटरवर काम करीत आहे. सत्यदेव दुबे, अमरीश पुरी आणि नसीरुद्दीन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शनाचे धडे घेतले. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या अनेक कार्यशाळेत सहभागी झाले. खुराणा यांनी आतापर्यत ८० नाटक दिग्दर्शित केली असून २०० नाटकात कामे केली आहे.
 राम रोटी योजनातंर्गत सुरेशचंद्र राठोर शहरातील विविध शासकीय रुग्णालयातील गरीब रुग्णांना गेल्या अनेक वर्षांपासून निशुल्क भोजन देत असतात. समाजातील काही दानशूर व्यक्तीकडून किंवा शहरातील विविध भागात घरोघरी अन्नधान्य मागून आणणे आणि घरी तयार करून ते रुग्णालयातील गरीब रुग्णांना देणे हा उपक्रम गेल्या अनेक दिवसांपासून ते राबवित आहेत. गरिबांचा भोजनदाता म्हणून राठोर यांना ओळखले जाते. राठोर यांच्या या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.