मौज, मस्ती, धमाल, स्पर्धा यांच्या जोडीला सामाजिक जाणीवांचे भान ठेवत तरुणाईला विविध सामाजिक उपक्रमांशी जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न आजकाल अनेक महाविद्यालयीन महोत्सवांमधून होतो आहे. मुंबईचे समुद्रकिनारे स्वच्छ करण्यापासून अनाथाश्रमातील मुलांकरिता कलाविषयक कार्यशाळा राबविण्यापर्यंतच्या अनेक उपक्रमांमधून तरूणाई स्वत:ला विद्यार्थीदशेतच सामाजिक कार्याला जोडून घेऊ पाहते आहे. या वर्षी टेकफेस्ट, मल्हार, उमंग अशा मुंबईतील लहानमोठय़ा महोत्सवांमधून विद्यार्थी समाजकार्यातही आपण मागे नाही, हे दाखवून देणार आहेत.
सामाजिक जाणीवांचे भान राखणाऱ्या उपक्रमांची सुरुवात मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘टेकफेस्ट’ आणि ‘मूड इंडिगो’मध्ये पहिल्यांदा झाली. टेकफेस्टमध्ये यंदा रोबोटिक्स वॉरबरोबरच पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापनावरील स्पर्धा संदेश देणाऱ्या स्पर्धा असणार आहेत. त्या शिवाय प्रत्यक्ष महोत्सव पार पडेपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. कॅन्सरविरोधात संदेश देणारा ‘आयस्मोक’ हा टेकफेस्टचा उपक्रम नुकताच पार पडला.
मुंबईतील इतरही लहानमोठय़ा महाविद्यालयांनीही आयआयटीचे अनुकरण करत विविध स्पर्धाबरोबच सामाजिक उपक्रमांना आपल्या महोत्सवांची माहिती देणाऱ्या ‘ब्रोशर्स’मध्ये जागा देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत अर्थातच सेंट झेवियर्सचा ‘मल्हार’ यात आघाडीवर आहे. मुंबईतील २४ महाविद्यालयांना सहभागी करून घेत दादर चौपाटी चकाचक करण्याचा कार्यक्रम नुकताच मल्हारच्या माध्यमातून राबविण्यात आला. मल्हारच्या एका गटाने गोरेगाव येथील ‘असिसी भवन’ या वृद्धाश्रमातील वयस्क व्यक्तींसोबत एक दिवस घालविला. येथील आजी-आजोबांसमवेत नाश्ता, जेवणाचा आनंद लुटण्याबरोबरच त्यांच्यासोबत विविध प्रकारचे खेळ खेळून त्यांच्यासोबत धम्माल केली. पासिंग द पार्सल, हाऊजी, गीत गायन, नृत्य यानंतर सर्वात शेवटी केक कापून या टीमने येथील वृद्धांचा दिवस अविस्मरणीय ठरविला. या विद्यार्थ्यांनी आपण तयार केलेल्या वस्तू भेटीदाखल दिल्या.
‘यार्ड सेल’ या दुसऱ्या एका उपक्रमात विद्यार्थ्यांकडून दान स्वरूपात मिळालेल्या वस्तू ‘स्नेह सागर सोसायटी’ आणि वृद्धाश्रमाला भेट म्हणून देण्यात आल्या. ‘चांगल्या कारणासाठी शॉपिंग’ या कल्पनेवर आधारलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
व्हीजेटीआयच्या प्रतिबिंब या महोत्सवातही यंदा महिला सबलीकरणावर ‘प्रज्ज्वला’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर घरोघरी जाऊन रद्दी जमा करून त्याच्या विक्रीतून आलेले पैसे सामाजिक संस्थांना दान करण्यात येणार आहे.
नरसी मोनजी महाविद्यालयाने ‘उमंग’ या आपल्या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने प्राण्यांच्या संवर्धनासाठी लढणाऱ्या ‘पेटा’ या स्वयंसेवी संस्थेशी जोडून घेऊन ‘स्टॉप लीदर कॅम्पेन’ राबविण्याचे ठरविले आहे. या मोहीमेच्या माध्यमातून चामडय़ाच्या वस्तूंबरोबरच मांसाहार टाळण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
महाविद्यालयीन महोत्सव केवळ मौजेचे किंवा स्पर्धापुरते मर्यादीत न राहता त्यात सामाजिक जाणीवा जोपासण्याचाही प्रयत्न असावा यासाठी आम्ही हे उपक्रम राबवितो आहोत. त्यामुळे महोत्सवाच्याही कक्षा रूंदावण्यास मदत होते, असे आयआयटीच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणाऱ्या दिव्यम बन्सल या विद्यार्थ्यांने सांगितले.