जगातील सर्वात बुटकी महिला म्हणून नोंदली गेलेली नागपूरची ज्योती आमगे आणि जगातील सर्वात लांब तळव्यांचा मनुष्य म्हणून नोंद झालेल्या मोरोक्कोच्या ब्राहीम तकीउल्ला यांची अलीकडेच कुवेत येथे झालेली भेट एकदम अनोखी ठरली. नागपूरची ज्योती आमगे ही १९ वर्षांची तरुणी अवघी २ फूट उंचीची असून तिची जगातील सर्वात ठेंगणी महिला म्हणून नोंद करण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकली आहे. यानिमित्ताने तिला कुवेतमधील स्पर्धेसाठी निमंत्रण मिळाले होते. आई रंजना आणि वडील किसनजी यांच्यासोबत ज्योती कुवेतला जाऊन आली. तेथे ज्योतीच्या पायाचे तळवे ३.७२ इंचाचे तर मोरोक्कोच्या ३१ वर्षीय तकीउल्लाच्या पायाचे तळवे १ फूट ३ इंच लांब आहेत. ज्योतीचे तळवे तकीउल्लाच्या पायांच्या तळव्यांच्या तुलनेत तब्बल चार पटींनी लहानसे आहेत. तब्बल दोन्ही विश्वविक्रमी व्यक्तींच्या पायाच्या तळव्यांची मोजणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी केली. ज्योतीला आता कॅनडातील गिनीज बुकच्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रण आले असून ती लवकरच पुन्हा विदेशात जाणार आहे.