मराठवाडय़ाच्या अध्र्या अधिक भागात पावसाची मुसळधार बरसात सुरू आहे आणि अध्र्या भागात नुसतीच रिमझिम सुरू आहे. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्य़ांत अजूनही म्हणावा असा पाऊस नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे. मराठवाडय़ात ७५० पेक्षा अधिक टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. बीड, औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांत दिवसभर भिज पाऊस होता. या तीनही जिल्ह्य़ांत मोठय़ा पावसाची गरज आहे. मराठवाडय़ात सरासरीच्या ३५.६९ टक्के पाऊस नोंदविण्यात आला.
दरम्यान, औरंगाबाद शहरासह आसपासच्या २०० गावांचे भवितव्य अवलंबून असलेल्या जायकवाडी जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत १६ दलघमी नवीन पाणी आले. औरंगाबाद जिल्ह्य़ात दररोज पावसाळी वातावरण निर्माण होते. सकाळच्या वेळी ढगांची एवढी दाटी असते की, आता जोरदार पाऊस पडेल, असे वाटू लागते. पण पावसात तसा जोर नाही. दिवसभर रिमझिम सुरू असते. मध्येच ती थांबते. त्यामुळे दिवस रेनकोट घालून सुरू होतो आणि तो संपतोही तसाच. तथापि, मोठा पाऊस झाला, असे समाधान काही मिळत नाही. मोठा पाऊस नसल्याने शहरावरील पिण्याचे पाण्याचे संकट अजूनही टळले नाही. औरंगाबाद, जालना व बीड वगळता विभागात अन्यत्र समाधानकारक पाऊस आहे. हिंगोली जिल्ह्य़ातील ७१ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्य़ात पैठणमध्ये सोमवारी १४ मिमी असा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. अन्य तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी १० ते १२ मिमी नोंदविली गेली. एकूण सरासरीत ९९.५० टक्के पाऊस नोंदवला गेला असला तरी पाणीसाठय़ात तशी वाढ झाली नाही. गेल्या २४ तासांत सोमवारी पडलेल्या पावसाची जिल्हानिहाय नोंद पुढीलप्रमाणे – औरंगाबाद १०.४ (२१७.०५), जालना ११.५६ (२४५.२९), परभणी ११.३ (२८६.६९), हिंगोली १९.६३ (४१६.७६), नांदेड १२.२९ (३५९.७४), बीड ६.४५ (२१९.६९), लातूर ५.४४(२६४.४१), उस्मानाबाद १.२४ (२०८.२४).
मोठय़ा धरणांची पातळी ‘जैसे थे’
परभणीत यंदा प्रथमच पावसाची संततधार
वार्ताहर, परभणी
यंदाच्या पावसाळ्यात पावसाने प्रथमच संततधार झड लावली आहे. सोमवारी सुरू झालेला पाऊस मंगळवारीही चालू होता. दोन दिवस सूर्यदर्शन घडले नाही. हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरला असून आतापर्यंतच्या पावसाने वार्षकि सरासरीच्या ३७ टक्क्यांपर्यंत प्रमाण गाठले.
सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळीच पावसाला प्रारंभ झाला. त्याआधी रात्रीही पावसाने हजेरी लावली. सोमवारी दिवसभर पडलेल्या पावसाने खऱ्या अर्थाने पावसाळ्याची प्रचीती आली. दुसऱ्या दिवशीही पावसाची झड कायम राहिली. दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या. कधी धिमे, तर कधी जोरकस असे पावसाचे स्वरूप राहिले. दोन्ही दिवस मनमुराद बरसलेला पाऊस पिकांना उपयुक्त ठरला. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस चालूच होता. सोमवारी सकाळी सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. शहरातील अनेक भागात पावसाच्या रिपरिपीमुळे चिखल तयार झाला. महापालिकेकडून पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही की मुरूम टाकला नाही. त्यामुळे पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्यांवरही खड्डय़ात पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण चांगले असून यंदाचा पाऊस २१ टक्क्यांहून अधिक आहे. मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ११.३० मिमी पाऊस झाला. आतापर्यंत २८६.६९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याची वार्षकि सरासरी ७७४ मिमी आहे. आतापर्यंत सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. वार्षकि सरासरीच्या निम्मा पाऊस या तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून चालू असलेल्या पावसाने शेतशिवारात पाणी असले, तरी जिल्ह्याचे महत्त्वाचे सिंचन प्रकल्प असलेल्या यलदरी, लोअर दुधना या धरणांच्या पाणीपातळीत मात्र अजूनही वाढ झाली नाही.
नांदेडमध्ये मुसळधार; ११ लघुप्रकल्प भरले
वार्ताहर, नांदेड
जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे ११ लघु प्रकल्प पूर्णत भरले आहेत. संततधार पावसाने जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले. या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला. दरम्यान, जोरदार पावसाने महापालिकेच्या कारभाराचे पितळही उघडे पडले.
जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. पेरणीची जवळपास ८० टक्के कामे पूर्ण होत आली असताना पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. पावसाच्या लहरीपणामुळे छोटय़ा-मोठय़ा लघु प्रकल्पांतील पाणीपातळीत वाढ होत नव्हती. सोमवारी सायंकाळपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मंगळवारीही सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. जिल्ह्यात सूर्यदर्शनही घडले नाही. संततधार पावसाने मोठय़ा, तसेच मध्यम व लघु प्रकल्पांतल्या पाणीपातळीत वाढ झाली. जिल्ह्यात २ मोठे, ९ मध्यम व ८० लघु प्रकल्प आहेत. ८०पकी किनवटमधील थारा, निचपूर, िपपळगाव, अंबाडी, दरसांगवी, सिरपूर व निराळा, माहुर तालुक्यातील पलाईगुडा व शालंबी ११ लघु प्रकल्प १०० टक्के भरले. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात आजमितीस ४६.७३ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. मानार प्रकल्पात १४.४३ टक्के पाणीसाठा असल्याचे सूत्रांनी सांगितले. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत दिलासादायक वाढ झाली. १८ प्रकल्पांत मात्र अजूनही वाढ झाली नाही.
गेल्या २४ तासांत तालुकानिहाय पडलेल्या पावसाची मिमीमध्ये नोंद अशी – नांदेड २१.६५, मुदखेड ५, अर्धापूर १७.६६, भोकर १४.५०, उमरी २, कंधार ५.२७, लोहा २१.१७, किनवट २७, माहुर ४०, हदगाव २१, हिमायतनगर १९.३३, देगलूर ६, बिलोली ९, धर्माबाद ०, नायगाव ८.८०, मुखेड ८.२८.
मनपाचे पितळ उघडे
पावसाळ्यापूर्वी करावयाच्या सर्व उपाययोजना केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला, तरी पहिल्याच दमदार पावसाने मनपाचे पितळ उघडे पडले. सखल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिरबुर्हाणनगर, श्रीनगर, प्रभातनगर, श्रावस्तीनगर, दत्तनगर, सखोजीनगर, तरोडा आदी भागात पाणीच पाणी झाले. उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असलेल्या वसंतनगर परिसरात अनेक घरात पहिल्याच पावसाने शिरकाव केला. वर्ष-दोन वषार्ंपूर्वी झालेल्या अनेक रस्त्यांना खड्डे पडले होते.
हिंगोलीत ७१ गावांना सतर्कतेचा इशारा
वार्ताहर, हिंगोली
जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. मंगळवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ातील ७१ गावांना सतर्कतेचा इशारा दिला.
हिंगोली तालुक्यातील १७, कळमनुरी १४, सेनगाव व वसमत प्रत्येकी १६ व औंढा नागनाथ ८ या प्रमाणे गावांना हा इशारा दिला आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाण्याची तळी तयार झाली असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. या दरम्यान सूर्यदर्शनही घडले नाही. गेल्या २४ तासांत सरासरी ४१६.१४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याची टक्केवारी ४७.२० आहे. गतवर्षी याच तारखेला २२.४० टक्के नोंद झाली होती.
गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट होता. धान्य विक्रीसाठी माल घेऊन येणारा शेतकरी मोंढय़ाकडे फिरकलाच नाही. रोजंदारीवर असणारे मजूर, रिक्षावाले ग्राहकांची प्रतीक्षा करीत होते. गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची मंगळवारी सकाळी आठ वाजता घेतलेली नोंद मिमीमध्ये, कंसात आजपर्यंत पडलेला सरासरी पाऊस – हिंगोली २२.५७ (४५२.३१), वसमत १२.८५(३९२.३२), कळमनुरी २२(३७२.२०), औंढा नागनाथ १७.२५(४७६.१२), सेनगाव २३.५०(३८७.७६). एकूण २०८०.७२, सरासरी ४१६.१४. याची टक्केवारी ४७.२० आहे.
नळदुर्ग, तुळजापूरचे जलसंकट तूर्त टळले
उस्मानाबाद
शहराजवळील बोरी धरणातील पाणीसाठय़ात बऱ्यापकी वाढ झाल्याने अणदूर गावासह नळदुर्ग व तुळजापूर या दोन शहरांवर ओढवलेले जलसंकट तूर्त टळले आहे.
नळदुर्ग परिसरात रोहिणी नक्षत्रात दाखल पाऊस नंतर मृग व आद्र्रा नक्षत्रात गायब झाला. सुरुवातीस पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात खरीप पिकांची पेरणी उरकली. परंतु पेरणीनंतर पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मागील १०-१२ दिवसांपासून तुळजापूर शहरास होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. नळदुर्ग शहरावरही गडद संकट उभे ठाकले होते. नळदुर्ग नगरपालिकेने बोरी धरणातील पाणी संपत आल्यानंतर परिसरातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करून शहराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णयही घेतला. या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरीही दिली होती. या पाश्र्वभूमीवर मागील २-३ दिवसांपासून पडलेल्या संततधार पावसाने बोरी धरणात नवीन पाणी येण्यास सुरुवात झाली. धरणाच्या पाणीसाठय़ात बऱ्यापकी वाढ झाल्याचे दिसत आहे.