स्त्री भ्रृण हत्येला आळा घालण्याच्या दृष्टिने सोनोग्राफी केंद्रांच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाने राबविलेल्या ऑनलाईन ‘एफ’ अर्ज नोंदणीला नाशिक शहर व ग्रामीण भागातून अक्षरश: ठेंगा दाखविला गेल्याचे उघड झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय व खासगी सोनोग्राफी केंद्रांनी एकही अर्ज भरलेला नाही. राज्यातील इतर भागातून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना नाशिकमधील अनास्थेवर आरोग्य विभागाने बोट ठेवले आहे.
बीडच्या प्रकरणानंतर स्त्री भ्रृण हत्येला आळा बसावा यासाठी शासनाने खंबीर पाऊले उचलण्यास सुरूवात केली. त्यामुळे काही अंशी सकारात्मक बदल दिसून येत असले तरी अद्यापही राज्य शासन व जिल्हा पातळीवर योग्य समन्वय साधला जात नसल्याने काही उपक्रम अडचणीत आले आहेत. सर्व शासकीय सोनोग्राफी केंद्रामधून http://pcpndt.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन ‘एफ’ अर्ज भरणे, हा त्याचाच एक भाग. नाशिकमधून अद्याप एकही अर्ज गेला नसल्याने महापालिका व जिल्हा स्तरावर असणारी अनास्था पुन्हा अधोरेखीत झाली आहे. वास्तविक, स्त्री भ्रुण हत्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. शासकीयस्तरावर कामकाजात पारदर्शकता यावी, म्हणून सर्व शासकीय सोनोग्राफी केंद्रांमधून ‘ऑनलाईन – एफ’ अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत वैद्यकीय अधिकारी आणि ‘डेटा  एन्ट्री ऑपरेटर’ यांना ऑनलाईन हे अर्ज कसे भरले जातात, याविषयी सहा महिन्यांपूर्वी प्रशिक्षणही देण्यात आले. तसेच सोनोग्राफी केंद्रधारकांना याबद्दल अवगत करून प्रशिक्षित करण्यात आले.
हे सोपस्कार पार पडल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा व महानगरपालिका पातळीवरून ‘ऑनलाईन एफ’ अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, अद्याप नाशिक जिल्ह्यातून या विषयी प्रतिसाद लाभला नसल्याचा ठपका आरोग्य विभागाने ठेवला आहे. राज्य पर्यवेक्षकीय मंडळाच्या बैठकीत ही बाब नुकतीच मांडण्यात आली. या प्रकाराची आरोग्य विभागाने आधीच गंभीर दखल घेतली होती. ‘ऑनलाईन एफ’ अर्ज भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील यंत्रणांना मार्गदर्शक सुचनाही पाठविण्यात आल्या. तथापि, लालफितीत काम करणारी स्थानिक यंत्रणा ढिम्मच राहिल्याचे या अहवालावरून दिसून येते.
वास्तविक, नाशिक जिल्हा स्त्री भ्रूण हत्या प्रमाणकानुसार संवेदनशील असूनही प्रशासकीय पातळीवरील अनास्था चिंताजनक आहे. ‘एफ’ अर्ज ऑनलाईन भरण्यामागे शासनाचे प्रमुख दोन हेतु आहेत. कागदोपत्री पसारा कमी करणे तसेच अचानक तपासणीस  आलेल्या पथकाला कागदपत्रे सादर करताना संबंधित डॉक्टर व पथकाचा वेळ वाचावा. त्याकरिता माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.  या उपक्रमाचा हेतु चांगला असला तरी त्याच्या पुर्ततेत अनेक अडचणी येत आहे. एफ अर्जासोबत संबंधित डॉक्टरांकडून ‘मी कुठल्याही प्रकारची गर्भ लिंग निदान चाचणी करत नाही,’ तसेच रुग्णाकडील संमतीपत्र भरून घेण्यात येते. याबरोबर एरवी चार अर्ज जे प्रसुतीपूर्व काळात सोनोग्राफी करण्यासाठी आवश्यक आहे, ते ऑनलाईन भरणे अपेक्षित आहे.  
या संपूर्ण कामासाठी प्रत्येक रुग्णामागे साधारणत: १५ ते २० मिनिटांचा अवधी लागतो. या संदर्भात नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासकीय आदेशानुसार प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात झाल्याचा दावा केला. सोनोग्राफी केंद्र संचालक अर्ज भरत असून याबाबत येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
संकेतस्थळात बिघाड होत असल्याची तक्रार
ऑनलाईन ‘एफ’ अर्ज भरण्यातील अनास्थेमागे वेगवेगळी कारणे पुढे केली जात असली तरी जे राज्यातील इतर जिल्ह्यांना जमते, ते नाशिकला का नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता अर्ज भरताना अनेकदा संकेतस्थळात बिघाड असतो, असे सांगितले जात आहे. अर्ज भरतांना अनेक क्लिष्ट बाबींचा सामना करावा लागतो. त्यात काही त्रुटी राहिल्यास तो डॉक्टर दोषी गृहीत धरला जात असल्याचे सोनोग्राफी केंद्र चालकांचे म्हणणे आहे. तांत्रिक अडचणी आणि अपुरे मनुष्यबळ याशिवाय वरिष्ठ पातळीवरून योग्य समन्वय न साधला गेल्याने एफ अर्ज भरण्यात चालढकल होत असल्याचे निदर्शनास येत आहे.