बॉलिवूडला दक्षिणेकडचे वारे तसे नवीन नाहीत. अगदी सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन यांच्यापासून ते चिरंजीवी, व्यंकटेश, मामुट्टी, मोहनलाल, नागार्जुन असे कित्येक दाक्षिणात्य अभिनेते हिंदी चित्रपटसृष्टीला ओळखीचे आहेत. पण, रजनीकांत आणि कमल हसन यांचा अपवाद वगळता कोणालाही बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. मात्र, आता एका तपानंतर दाक्षिणात्य अभिनेत्यांची दुसरी तरूण पिढी बॉलिवूडमध्ये शिरकाव करू पाहते आहे. गेल्या दोन वर्षांत एकेक करत नवे दाक्षिणात्य चेहरे हिंदी चित्रपटांमध्ये झळकत आहेत. त्यांच्यापैकी काहीजण यश मिळाले नाही म्हणून पुन्हा आपल्या टॉलिवूडमध्ये परतले तर काहीजण अजूनही रेंगाळले आहेत. मात्र, यावर्षी दोन दाक्षिणात्य अभिनेत्यांवर सगळ्यांच्या नजरा रोखल्या गेल्या आहेत. पहिला आहे सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई धनुष आणि दुसरा चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा. खरेतर, यावर्षी रामचरण तेजाचा ‘जंजीर’ पहिल्यांदा प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र, कानामागून आला तिखट झाला या उक्तीप्रमाणे ‘कोलावेरी’ डी म्हणत प्रसिध्द झालेल्या धनुषने पहिल्यांदा प्रत्यंचा चढवली आहे.
आनंद राय दिग्दर्शित ‘रांझना’ हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्यात सोनम कपूर त्याची नायिका आहे. अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या धनुषच्या ‘रांझना’ला तिकीटबारीवर यश मिळाले तर नक्कीच नव्या जोमाने बॉलिवूडमध्ये दक्षिणेचे वारे वाहू लागतील. कारण, चिरंजीवी, नागार्जुन, ‘रोझा’ सारखा चित्रपट करणारा अरविंद स्वामी आदींच्या पिढीला जसे इथे फार यश मिळाले नव्हते तसेच नव्या पिढीतील टॉलिवूडचा सुपरहिरो सुरिया, मल्याळम अभिनेता पृथ्वीराज, विक्रम, राणा डुग्गुबाती अशा अनेक कलाकारांनी हिंदीत चांगले चित्रपट केले. पण, त्यांनाही प्रभाव पाडता आला नाही. या पाश्र्वभूमीवर धनुषचा ‘रांझना’ तून आणि रामचरण तेजाचा ‘जंजीर’च्या रिमेकमधून बॉलिवूड प्रवेश होतो आहे. या दोघांपैकी कोण बॉलिवूडमधील अपयशाचे दुष्टचक्र भेदणार?, ही खरी उत्सुकता आहे.