तस्करीच्या उद्देशातून परराज्यातून विनापरवाना स्पिरीटचा टँकर आणणाऱ्या एका आरोपीला गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. आशिक झाकीर हुसेन (वय ३५ रा.राजेंद्रनगर, जिल्हा,इंदूर, मध्य प्रदेश) याच्याकडून १ कोटी ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ३१ डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनांची तपासणी सुरू केली होती. न्यू करंजे फाटा (ता.राधानगरी) येथून मध्य प्रदेश राज्यातून येणाऱ्या एक टँकर या पथकाला आढळला. त्याची तपासणी केली असता त्यातून अवैध रीत्या स्पिरीटची वाहतूक होत असल्याचे आढळले. या स्पिरीटची किंमत १ कोटी ११ लाख रुपये इतकी आहे. हा टँकर गोवा येथे स्पिरीट विक्रीसाठी जात असल्याची कबुली वाहनचालक आशिक हुसेन याने पथकाला दिली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक जगन्नाथ पाटील, सचिन भवड, सहायक दुय्यक निरीक्षक के.पी.शैलार व अन्य सहकाऱ्यांनी केली.