महानगरपालिकेची स्थायी समिती पुन्हा निम्म्या सदस्यांवरच कार्यरत ठेवण्याचा डाव सत्ताधा-यांनी खेळल्याची चर्चा सुरू आहे. समितीचे सोळापैकी आठ सदस्य आज निवृत्त झाले, मात्र प्रशासनाने नव्या निवडीची प्रक्रियाच सुरू न केल्याने पालिका वर्तुळात ही चर्चा सुरू आहे. मात्र गेल्या वर्षीही मुदतीनंतर १५ दिवसांनी या निवडी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
स्थायी समितीच्या सदस्यांची मुदत दोन वर्षांची असली तरी वरिष्ठता क्रमानुसार आठ सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. त्यानुसार किशोर डागवाले (मनसे), नितीन जगताप, दिलीप सातपुते (शिवसेना), नीलिमा गायकवाड (भाजप), मोहिनी लोंढे, सुनील कोतकर (दोघेही काँग्रेस), श्रीमती उडाणशिवे, खान वहाब खान (दोघेही राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे.  हे आठजण आज निवृत्त झाले. मात्र नव्या निवडीची प्रक्रियाच अद्याप सुरू झालेली नाही.
मनपाच्या नगर सचिव कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर महापौरांना मनपाची सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. अशा सभेत राजकीय पक्षांच्या निर्धारित कोटय़ानुसार नव्या निवडी केल्या जातात. ही नावे कळवण्याचा अधिकार मनपातील पक्षांच्या गटनेत्यांना आहेत. त्यांनी शिफार केलेल्या नावांनुसार ही निवड केली जाते. या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा प्रस्तावच दोन, तीन दिवसांपूर्वी प्रशासनाला प्राप्त झाला. मात्र त्यावरही पुढची कार्यवाही न झाल्याने निर्धारित मुदतीत नव्या निवडी होऊ शकल्या नाही. त्यामुळेच मनपात याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
मनपात याआधीही निम्म्या म्हणजे आठ सदस्यांवरच स्थायी समितीचा कारभार चालला होता. राष्ट्रवादीची सत्ता असताना समितीचे तत्कालीन सभापती संजय गाडे यांच्या कारकार्दीत हा प्रकार झाला होता. आताही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त होते.  
दरम्यान नव्या सदस्यांना अत्यंत कमी अवधी मिळणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये मनपाचीच मुदत संपते, त्यापूर्वीच मनपाची निवडणूक होईल. म्हणजेच नव्या सदस्यांनी पाचच महिने मिळणार असून त्यातीलही काही काळ आचारसंहितेत जाणार आहे, तो लक्षात घेता या सदस्यांना दोन, तीन महिनेच मिळतील. त्यामुळे यावेळी इच्छुकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे सांगण्यात येते.