करण जोहरची भविष्यवाणी
‘राज कपूर, शम्मी कपूर, देव आनंद, राजेश खन्ना, धर्मेद्र..यांसारख्या कलावंतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. रसिकप्रेक्षकांच्या अनेक पिढय़ा या कलावंतांची ‘स्टाईल’, ‘करिष्मा’ रूपेरी पडद्यावर पाहात मोठय़ा झाल्या. अनेकांचे ते ‘आयडॉल’ ठरले. परंतु, आज हा ‘स्टारडम’ जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे, असे मत निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सिनेमा शताब्दीच्या निमित्ताने व्यक्त केले आहे.
रूपेरी पडद्यावरच्या नायकांची लोक अक्षरश: पूजा करायचे, चित्रपट अभिनेत्यांविषयी असलेली उत्सुकता, चित्रपट कलावंतांना प्राप्त झालेले ‘स्टारडम’, रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेकवर्षे विराजमान होण्याचे भाग्य लाभलेले कलावंत आता यापुढे नसतील. आजच्या काळात आणि इथून पुढेही बॉलिवूडच्या कलावंतांना ते ‘स्टारडम’ कधीच मिळणार नाही, असे करण जोहर  म्हणाला.
तंत्रज्ञानामुळे हा बदल झाला असून शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, सैफ अली खान यांना ‘स्टार’ म्हणून लोकांनी डोक्यावर घेतले तो काळही आता सरला आहे. आता नवोदित कलावंतांना ते ‘स्टारडम’ मिळू शकणार नाही. स्मार्ट फोन्स आणि सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींविषयी लोक फक्त माहिती घेतील. अद्ययावत तंत्रज्ञान हातात आले असले आणि त्याचे फायदे होत असले तरी ‘स्टार’ला ते मारक ठरणार आहे.
 आपल्या आवडत्या स्टार कलावंतांविषयी असलेले आकर्षण, त्यांच्याविषयीची वैयक्तिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता हे आता कमी झाले आहे, होणार आहे. मात्र असे असूनही अनेक स्टार कलावंतांसोबत चित्रपट केल्यानंतर करण जोहर नवोदित कलावंतांना घेऊन चित्रपट करीत आहे. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ नंतर  ‘हसी तो फसी’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘ये जवानी है दिवानी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करीत           आहे.