चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज मार्गावरील, मुंबईतील पहिल्या मोनोरेलवरील पहिल्या टप्प्यातील सातही स्थानके अत्याधुनिक सुविधांसह बांधून तयार झाली आहेत. प्रतीक्षा आहे ती फक्त या स्थानकांमध्ये प्रत्यक्ष मोनो रेल प्रवेश करते कधी याची! चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज या २० किलोमीटरच्या मार्गावर मुंबईतील व भारतातील पहिली मोनोरेल धावणार आहे. तिचा पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा असा ८.८ किलोमीटर लांबीचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून गुलाबी, निळय़ा आणि पिस्ता रंगाची आकर्षक आणि वातानुकूलित मोनोरेल विविध चाचण्यांसाठी धावत आहे. आता मोनोरेल कर्मचाऱ्यांसह धावत आहे. मोनोरेलची स्थानके उंचावर असल्याने प्रवाशांना स्थानकात जाण्यासाठी लिफ्टची सुविधा आहे. तिकिट कक्षाबरोबरच स्वयंचलित तिकिट यंत्रणाही (टीव्हीएम) बसवण्यात आली आहे. या साऱ्या यंत्रणांची चाचणी सुरू असून त्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे मोनोरेलची स्थानके आता प्रवासी वापरासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहेत. मात्र..
मोनोरेलच्या व्यावसायिक वापरासाठीचे प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. किमान १५ दिवस ते कमाल दोन महिन्यांत हे प्रमाणपत्र मिळेल. त्याचबरोबर सेवा सुरू करण्यासाठीच्या नियामावलीलाही मंजुरी मिळत आहे. त्यानंतर लगेचच मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. त्यामुळे नोव्हेंबपर्यंत मोनोरेल कार्यान्वित होईल, असा विश्वास अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला. मोनोरेल ही प्रवासासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. प्राधिकरणाने याबाबत सर्व ती काळजी घेतली आहे, असा दावाही भिडे यांनी केला.
*  पहिल्या टप्प्यात मोनोरेलची सेवा चेंबूर ते वडाळा या ८.८ किलोमीटर
     लांबीच्या मार्गावर सुरू होणार आहे. नंतर दुसऱ्या टप्प्यात वडाळा ते संत
     गाडगे महाराज चौक या ११.२ किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल
      सुरू होईल.
*  पहिल्या टप्प्यात चेंबूर, आर. सी. मार्ग, आरसीएफ वसाहत, भारत
      पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा अशी सात
      स्थानके आहेत.
*  चार डब्यांच्या मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६८ इतकी आहे.
*  मोनोरेलची कमाल वेगमर्यादा ८० किलोमीटर प्रतितास असली
     तरी मोनोरेल स्थानकांमधील कमी अंतरामुळे मुंबईतील मोनोरेल
     ३१ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल.
*  सकाळी पाच ते मध्यरात्री बारा या वेळेत मोनो धावेल.
*  चेंबूर ते वडाळा हे सरासरी पाऊण तासांचे अंतर मोनोरेलमुळे
      अवघ्या १९ मिनिटांत कापता येईल.