सिन्नर फाटा येथील महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या नेत्या सत्यभामा गाडेकर यांनी सुरू केलेले उपोषण महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी रात्रीच  हा पुतळा महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित केला.
सिन्नर फाटा येथील जुन्या महापालिकेच्या शाळा व दवाखाना आवारात महात्मा जोतिबा फुले यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता. कालांतराने तेथील शाळा व दवाखाना बंद झाल्यानंतर फुले यांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी राहिला. त्यामुळे हा पुतळा दर्शनी भागात स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. या मागणीकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमध्ये असंतोष होता. पालिकेकडून मागणीची दखल घेण्यात येत नसल्याचे लक्षात आल्यावर शिवसेनेच्या नेत्या सत्यभामा गाडेकर यांनी फुले यांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी अखेर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. गाडेकर यांनी अन्य कार्यकर्त्यांसह फुले यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केले. त्यांच्या  भूमिकेचे स्वागत करून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, सूर्यकांत लवटे, सुनील वाघ, समता परिषदेचे भगवान बिडवे, शिवाजी भोर यांच्यासह अन्य राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी भेट घेऊन गाडेकर यांना पाठिंबा दिला. बुधवारी दुपारी महापौर वाघ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन महासभेत पुतळा स्थलांतराचा विषय मंजूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गाडेकर यांनी उपोषण मागे घेतले.