मंदिराजवळील शेड जेसीबीने काढले जात असताना जमावाने त्यास विरोध करून दगडफेक केली. दगडफेकीत पाच वाहनांचे नुकसान झाले. छावणी पोलिसांनी याबाबत २२-२३जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले. भरदुपारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. रेल्वेस्थानक ते पद्मपुरा रस्त्यावर हा प्रकार घडला.
दगडफेकीत एस. टी. महामंडळाच्या दोन, तर दोन खासगी ट्रॅव्हल्स व एका ट्रॅक्सच्या काचा फुटल्या. यात सुमारे ६८ हजारांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. समाधान दौलतराव दाभाडे (वय ३६, एस. टी. बसचालक, ढवळेश्वर मंदिर, भोकरदन रस्ता, जालना) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी २२जणांवर गुन्हय़ाची नोंद करून कचरूसिंग रामसिंग राजपूत (बनेवाडी, औरंगाबाद) व साईनाथ काशिनाथ दुशिंग (साठेनगर) यांना ताब्यात घेतले. शुभम संजीव बनसोडे (बनेवाडी), डब्ल्यू. दाभाडे, करणसिंग बहुरे, नितीन दाभाडे, शैलेश झाल्टे, भगतसिंग शिंगोळे, विशाल बनसोडे, रोहित बनसोडे, सुरेश व सुदाम चहा टपरीवाला, दीपसिंग शिंगोळे व अन्य नऊजणांविरोधात गुन्हय़ाची नोंद करण्यात आली. पोलिसांनी सांगितले, की अयोध्यानगरी येथे असलेल्या गणपती मंदिराचे लष्कराच्या हद्दीत येणारे शेडवजा बांधकाम बुधवारी दुपारी लष्करी जवानांनी जेसीबीने हटविले. मात्र, या प्रकारास स्थानिक लोकांनी जोरदार विरोध केला. त्यातूनच दगडफेक झाली. दगडफेकीत पैठण-सुरत ही एस. टी. बस, तसेच शहर वाहतुकीची बस, दोन खासगी प्रवासी वाहतुकीच्या बस व एका ट्रॅक्सच्या काचा फुटल्या. यातील एक खासगी बस कर्नाटकातील असून जळगावला विवाह सोहळय़ासाठी या बसमधील लोक चालले होते. दगडफेकीत या बसच्या काचा फुटल्याने हे लोक घाबरून गेले. पोलिसांनी धाव घेतल्याने तणाव निवळला. संध्याकाळी उशिरापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले. अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.