पार्लेकरांचे ‘सीतारामां’ना साकडे
विलेपार्ले परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळेच मुसळधार पावसात विलेपाल्र्यातील अनेक रस्ते जलमय झाले. अनधिकृत बांधकामरूपी ‘रावणा’चे महापालिकेतील ‘सीतारामां’नी समूळ उच्चाटन करावे, असे साकडे विलेपार्लेकरांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना घातले आहे.
गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामध्ये विलेपार्ले पूर्व परिसरातील नेहरू रोड जंक्शन, मालवीय रोड, एम. जी. रोड आणि आसपासचे काही लहानमोठे रस्ते जलमय झाले. या रस्त्यांवर अनधिकृत दुकानांचा सुळसुळाट झाला आहे. ही दुकाने पर्जन्य जलवाहिन्या आणि गटारांना अडथळा ठरली आहेत, त्यामुळेच पाणी तुंबते आणि अवघा परिसर जलमय होतो, अशी तक्रार ‘विलेपार्ले विकास मंच’ने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
नेहरू रोड, मालवीय रोड आणि एम. जी. रोडवर अनेक ठिकाणी गटारावरतीच मोबाइल दुरुस्ती, स्टेशनरी, झेरॉक्स, सॅण्डविच विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. काही हॉटेल्स आणि मोठय़ा दुकानदारांनी पदपथांवरच नव्हे तर रस्त्यावरील गटारांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊ शकला नाही आणि सारा परिसर जलमय झाला, असे या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात विलेपार्ले विकास मंचने पालिका विभाग कार्यालयापासून थेट पालिका मुख्यालयात तक्रारी केल्या. परंतु त्याची दखल न घेतल्याने  आता मंचने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनाच साकडे घातले आहे. विलेपार्ले येथील अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडून पदपथ आणि रस्ते मोकळे करावेत, असे आवाहन मंचचे कार्यवाह प्रमोद मुजुमदार यांनी केले आहे.