भाजपचे एकेकाळचे शीर्षस्थ नेते आणि मधल्या काळात गुजरातमधल्या राजकारणाचे बळी ठरलेले संजय जोशी पक्षामध्ये सक्रिय होत असताना स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मात्र भीतीपोटी पाठ फिरविली. मात्र, त्यांच्या निवडक समर्थकांनी जोशी यांच्या समर्थनार्थ घोषणा देत उत्साहात स्वागत करून शक्तिप्रदर्शन केले.
मूळचे नागपूरकर आणि संघाचे स्वयंसेवक असलेले संजय जोशी यांनी गुजरातमध्ये असताना राष्ट्रीय राजकारणात आपल्या कामातून वेगळा ठसा निर्माण केला होता. मात्र, त्याच काळात ते तेथील राजकारणाचे बळी ठरले आणि पक्षापासून ते काही काळ दूर राहिल्यानंतर राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यानंतर ते पुन्हा सक्रिय होऊ पहात आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्न करीत आहे. गुजरात, नागपूरसह देशातील विविध भागात संजय जोशी यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात येऊन सक्रिय व्हावे, अशी अनेकांची इच्छा असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील विविध भागात त्यांच्या आगमनाचे फलक लावण्यात आले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे छायाचित्र आहे. संजय जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये फलक लावणाऱ्या दोन नेत्यांवर कारवाई केल्याची चर्चा असताना नागपूरमध्ये त्यांच्या आगमनावर शहरातील स्थानिक नेत्यांनी काहीच न बोलण्याचे पंसत केले. शहरात फलक लावण्यात आले असले तरी त्यात केवळ विनित भाजपचे कार्यकर्ते, असा उल्लेख करण्यात आला होता. संजय जोशी यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर कधीही पक्षात न दिसणाऱ्या समर्थकांनी भाजपचा विजय असो, संजय जोशी ‘आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत जल्लोषात स्वागत केले. स्वागतासाठी पक्षाचे ध्वज लावण्यात आले होते. एरवी पक्षाचा कुठलाही ज्येष्ठ नेता शहरात आला की त्यांच्या स्वागतासाठी दिसणारे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पक्षाचे आमदार, नगरसेवकासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने विमानतळावर असतात. मात्र, यापैकी आज सगळ्यांनी पाठ फिरविली. संजय जोशी यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचे स्वागत केले. शहरातील एकही नेता उपस्थित नसल्यामुळे जोशी यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.माजी नगरसेवक रमेश चोपडे हे पक्षामध्ये पदाधिकारी असले तरी जोशी यांचे खंदे समर्थक  आहेत. मात्र, ते सुद्धा स्वागतासाठी दिसले नाही. दोन महिने आधी नागपुरातील रामनगर भागात संजय जोशी यांनी नागपूर भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. मोदी यांचे केलेले कौतुक म्हणजे ते पुन्हा पक्षात सक्रिय होणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे अनेक नेते त्यांच्यासोबत होते. मात्र, आज कोणीही दिसून आले नाही. संजय जोशी यांचे आगमन झाल्यावर टेकडी गणपती मंदिरातील महाप्रसादामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर मध्यप्रदेश सिवनी येथे आयोजित एका कार्यक्रमाला दुपारी रवाना झाले.
या संदर्भात शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे म्हणाले, संजय जोशी यांच्या स्वागतासाठी कोणी जाऊ नये, असा कुठलाही आदेश पक्षाकडून काढण्यात आला नव्हता. स्थानिक पदाधिकारी कोणी दिसले नसेल तर त्यांची माहिती नाही. मात्र, कुणावर स्वागतासाठी जाऊ नये असे बंधन नव्हते, असे खोपडे यांनी सांगितले.