विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या खाजगी आणि अनुदानित शाळेतील बसेसेवेबाबत नियमावली तयार करण्यात आली असून त्यानुसार शाळांनी नियमांचे पालन केले पाहिजे अन्यथा शाळा सुरू होताच कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस विभागातर्फे देण्यात आला आहे.
शहरातील सर्व शाळेला २६ जूनला प्रारंभ होणार आहे. राज्य शासनाने स्कूलबसच्या संदर्भात नियमावली तयार केली असून त्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी नुकतीच पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितमध्ये नागपूर शहर आणि जिल्हा स्कूल बस समितीची बैठक झाली आहे. ज्या स्कूल बस व स्कूल व्हॅन चालकांनी शासनाच्या नियमांचे पालन केले आणि स्वतच्या वाहनात सुधारणा केली नाही त्यांच्यावर सीबीएसई शाळा सुरू होण्यापूर्वी कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत   देण्यात आला आहे.
गेल्या सत्रात प्रादेशिक परिवहन विभागाने अनेक स्कूलबसच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारून अनेक वाहनांवर कारवाई केली होती. त्यानंतर स्कूल बस चालक संघटनेने नियम पूर्ततेचे आश्वासन दिल्यावर त्यांना ३० एप्रिल २०१३ पर्यंत मुदतवाढ दिली होती. मुदत निघून घेल्यावरही शहरातील ५०० पैकी केवळ ११० स्कूल बसचालकांनी नियमांची पूर्तता केली असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आले. नागपुरात सध्या पूर्व नागपूर आणि शहर अशी दोन प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. यापैकी नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात २८८ तर पूर्व नागपुरातील कार्यालयात २२४ स्कूल बसची नोंद आहे. दरम्यान स्कूल बस सुरक्षितता समितीची नुकतीच बैठक झाली असून ही समिती लवकरच विविध स्कूलबसची पाहणी करून नियमावलीची अंमलबजावणी केली की नाही याची चाचपणी करणार असल्याची माहिती मिळाली. अंमलबजावणीचे नियोजनही करण्यात आले आहे. नियमावलीमध्ये शाळेचे प्रशासन, बसचा ठेकेदार व प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बसबाबतचे कडक नियम करण्यात आले आहेत. शालेय बसला पिवळा रंग व चालकाकडे पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव, तसेच बिल्ला आवश्यक आहे. आपात्कालिन खिडकी, अग्निशामक यंत्राची व्यवस्था, बसमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, विद्यार्थ्यांचे थांबे आदींची माहिती असावी. शालेय वाहनासोबत शालेय प्रशासन व कंत्राटदार यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी सहायकाची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बस १५ वर्षांपेक्षा जुनी नसावी, असा नियम घालण्यात आला आहे.
सध्या विद्यार्थी वाहतुकीत असलेल्या बहुतांश वाहनांची स्थिती वाईट आहे. काही मोठय़ा शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था आहे. या शाळांच्या बस चांगल्या स्थितीत असतात. काही शाळा कंत्राटदाराकडून चांगल्या बसचाच आग्रह धरतात. मात्र, बहुतांश शाळा विद्यार्थी वाहतुकीची जबाबदारी घेत नाहीत. विद्यार्थी शाळेच्या आवारात आल्यानंतरच शाळा त्याची जबाबदारी घेईल, अशी अनेक शाळांची भूमिका असते. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणारे वाहन कशा स्थितीत आहे, याची माहिती घेतली जात नाही. अशा स्थितीत अत्यंत जुन्या व कोणतीही विशेष सुविधा, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसलेल्या अनेक बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते आहे. मूळ प्रवासी वाहतुकीतून बाद झालेल्या जुनाट गाडय़ा रंगरंगोटी करून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत वापरण्यात येतात. अशाच वाहनातील दोषांमुळे अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी तातडीने नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रादेशकि परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.