रेल्वेमार्गावरील महिलांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह असताना आता रेल्वे कर्मचारीही फार सुरक्षित नसल्याचे डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर गुरुवारी घडलेल्या एका घटनेवरून स्पष्ट झाले आहे. कॉटनग्रीन स्थानकाजवळ स्टंटबाजी करताना रेल्वेतून पडून जखमी झालेल्या एका तरुणाची नोंद केली जात असताना त्याच्या साथीदारांनी एका रेल्वे कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच जखमी तरुणासह त्यालाही रुग्णवाहिकेत कोंबून शीव येथील सरकारी रुग्णालयापर्यंत घेऊन गेले. त्यानंतर या कर्मचाऱ्याची सुटका झाली. या कर्मचाऱ्याने त्वरीत वडाळा रेल्वे पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या जमावापैकी एकाला ताब्यात घेतले. विशेष बाब म्हणजे आपल्या एका सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण होऊनही अन्य कर्मचाऱ्यांनी संयम पाळून कामावर परिणाम होऊ दिला नाही.
गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कॉटनग्रीन स्थानकाजवळ एक तरुण स्टंटबाजी करताना गाडीतून पडला. या स्थानकांवर ‘स्टेशन मास्तर’ नसल्याने येथील बुकिंग क्लार्क असे प्रकार हाताळतात. त्यानुसार डॉकयार्ड स्थानकातील बुकिंग क्लार्क पंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एकही पोलीस कामावर नव्हता. पंडागळे यांनी हमालांना बोलावून जखमी तरुणाला डॉकयार्ड रेल्वे स्थानकात आणले. रेल्वेच्या कार्यपद्धतीप्रमाणे जखमी तरुणाची माहिती नोंदवहीत लिहीत असताना या तरुणासह असलेले इतर काही तरुण पंडागळे यांच्या कक्षात घुसले. लवकर काम करा, त्याचा जीव गेला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या देत यापैकी एका तरुणाने पंडागळे यांना मारायला सुरुवात केली. त्यानंतर या सर्वानी जखमी तरुणाला स्ट्रेचरवरून उचलत थेट रुग्णवाहिकेत ठेवले. त्याच्यासह पंडागळे यांनाही त्यांनी या रुग्णवाहिकेतून शीव येथील सरकारी रुग्णालयापर्यंत नेले. जखमी तरुणावर उपचार सुरू झाल्यानंतर मग त्यांनी पंडागळे यांना सोडले. पंडागळे यांनी त्वरीत वडाळा रेल्वे पोलिसांत धाव घेत सदर प्रकाराची तक्रार नोंदवली. वडाळा पोलिसांनी शीव येथील सरकारी रुग्णालय गाठून या तरुणाबरोबर असलेल्या एकाला ताब्यात घेतले. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार पुन्हा घडल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटतील, असा इशारा ‘एनआरएमयू’ या संघटनेचे राष्ट्रीय सचिव कॉ. वेणु नायर यांनी दिला आहे. मारहाणीचा गंभीर प्रकार घडूनही डॉकयार्ड स्थानकातील कर्मचाऱ्यांनी तिकीट काऊंटर व अन्य कामे सुरूच ठेवली, हे त्यांनी आवर्जून सांगितले.