विट भट्टी परवानाधारकाकडून २४ हजार रुपयांची लाच घेतल्याच्या कारणावरून अटक झालेल्या तहसीलदाराला अखेर निलंबित करण्यात आले आहे.  
 उमरखेडचे तहसीलदार सुरेश थोरात यांनी २० डिसेंबरला ढाणकी येथील विटभट्टी परवानाधारकाकडून लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते आणि पुसदच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने थोरात यांना सात दिवसाची पोलीस कोठडीही सुनावली होती.
उल्लेखनीय म्हणजे, पोलीस कोठडी संपल्यानंतर तहसीलदार थोरात यांना निलंबित करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने तहसीलदार थोरात यांच्या निलंबनासाठी आंदोलन करून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी या प्रकरणी चौकशी करून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे अहवाल सादर केला होता. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार थोरात यांना निलंबित केले आहे.
तहसीलदारांचा प्रभार आता नायब तहसीलदार एस.एच.बुटले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य नितीन कुमार भुतडा, माधव व्यास, गजानन मोहळे, समाजवादी पार्टीचे निसार पेंटर, विलास चव्हाण, महेश काळेश्वरकर, सुनील वानखडे, उत्तम जाधव, दीपक ग्यानचंदानी, मनोज देशमुख इत्यादींनी तहसीलदार थोरात यांच्या निलंबनाची मागणी केली होती. थोरात यांना निलंबित करण्यात आल्याचे समजताच उमरखेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.