ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्टीसंबंधी व्यवस्थापकांनी काढलेल्या लेखी आदेशावर शेरा मारल्याप्रकरणी उपव्यवस्थापक लक्ष्मण कांबळे यांना त्वरित निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच यासंबंधीचा अहवाल येईपर्यंत परिवहन समितीच्या सभा तहकूब ठेवण्याचे आदेश प्रभारी परिवहन समिती सभापती प्रकाश कदम यांनी बुधवारच्या सभेत दिले. तसेच परिवहन सदस्यांना तीन दिवसांत उत्तरे देण्यासंबंधी व्यवस्थापकांनी सर्व खातेप्रमुखांना लेखी आदेश बजावलेले असतानाही त्याचे पालन होत नसल्याने सर्वच सदस्यांनी प्रशासनाच्या कारभाराविषयी या सभेत नाराजी व्यक्त केली.
ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीसंबंधी नुकताच एक लेखी आदेश जारी केला होता. या आदेशाच्या प्रतीवर उपव्यवस्थापक लक्ष्मण कांबळे यांनी लेखी शेरा मारला होता. त्यामध्ये संबंधित आदेश तूर्त अमलात आणू नये, असे म्हटले होते. या संदर्भात परिवहन सदस्यांनी मागील सभेत उपव्यवस्थापक कांबळे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्यापही त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही. याच मुद्दय़ावरून परिवहन सदस्य भरत ठक्कर हे आक्रमक झाले व त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या संदर्भात परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यानुसार, ठाणे परिवहन कर्मचाऱ्यांच्या सुट्टीसंबंधी व्यवस्थापकांनी काढलेल्या लेखी आदेशावर शेरा मारल्याप्रकरणी उपव्यवस्थापक लक्ष्मण कांबळे यांना त्वरित निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच यासंबंधीचा अहवाल येईपर्यंत परिवहन समितीच्या सभा तहकूब ठेवण्याचे आदेश प्रभारी परिवहन समिती सभापती प्रकाश कदम यांनी या वेळी दिले.