पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून रस्त्यांच्या साफसफाईचे काम पत्करणाऱ्या मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांच्या हुषारीमुळे प्रशासनाच्या पोटात गोळा आला आहे. पालिकेच्या सुमारे ४० टक्के कामगारांनी पोटभाडेकरू च्या धर्तीवर पोटमजूर नेमल्याचे एका पाहणीमध्ये आढळून आल्याने त्यांचा हा अपराध प्रशासन पोटात घालणार की त्यांच्यावर कारवाईचा ‘पोटा’ उगारणार, याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.  फार पूर्वीपासूनच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगार भल्यापहाटे झाडलोट करून मुंबई स्वच्छ करीत आले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये दांडीबहाद्दर सफाई कामगारांची संख्या वाढली आहे. आजघडीला पालिकेच्या प्रत्येक प्रभागात सुमारे १५० सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली असून प्रभागातील चौक्यांमध्ये सकाळी हजेरी लावून ते कामाला निघून जातात. काही दिवसांपूर्वी मनसेच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्यांमधील सफाई कामगारांची उपस्थिती आणि त्यांच्या कामाची पाहणी केली. या चौक्यांमध्ये तब्बल ७० टक्के सफाई कामगार अनुपस्थित असल्याचे या पाहणीत आढळून आले. त्यामुळे उर्वरित कामगारांवर कामाचा ताण पडत आहे. मद्य सेवन करून येणाऱ्या काही कामगारांना धड उभेही राहता येत नसल्याचेही निदर्शनास आले. उपस्थित असलेल्या कामगारांपैकी काहींजण खासगी इमारती, दुकानांची झाडलोट करून अतिरिक्त पैसे कमविण्याच्या कामात गुंतलेले असतात. काही कामगार सकाळी एक तास उशिरा येतात आणि दुपारी दीड तास लवकर घरी पळतात. त्यामुळे मुंबईच्या साफसफाईवर परिणाम होत आहे. अनुपस्थित राहणाऱ्यांपैकी बहुसंख्य कामगारांनी आपले काम अन्य कामगारांवर सोपविले आहे. महिन्याला तीन ते पाच हजार रुपये देऊन ही मंडळी आपल्या वाटय़ाचे सफाईचे काम अन्य कामगारांकडून करून घेतात आणि कामावर न जाताच ही मंडळी दर महिन्याला वेतन घेतात. इतरांचे काम करून जादा पैसे मिळत असल्यामुळे हे कामगार खुशीने काम करतात. मात्र या कामगारांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून त्याचा स्वच्छतेवर परिणाम होत आहे. सफाई कामगारांविरुद्ध कडक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्यानंतर कामगार संघटनांकडून प्रशासनावर मोठय़ा प्रमाणावर दबाव टाकण्यात येतो. राजकीय पक्षांचे एक अंग असलेल्या या कामगार संघटनांमुळे प्रशासनाला सफाई कामगारांपुढे नांगी टाकावी लागते. परंतु त्यामुळे मुंबईकरांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो याचे मात्र कुणालाच सोयरसुतक नाही.