टंचाईची भीषणता सरकारी प्रस्तावांमध्ये दिसू लागली आहे. जालना जिल्हय़ातील जाफराबाद, भोकरदन, जालना, परतूर, मंठा व घनसावंगी तालुक्यांमधील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी खडकपूर्णा व निम्नदुधना नदीपात्रात वाळूमध्ये चर खणले जाणार आहेत. आठ मीटर खोलीच्या या चरांमध्ये पाणी साठेल व ते टँकरद्वारे पिण्यासाठी पुरविले जाईल, असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खडकपूर्णा धरणात चर घेण्यासाठी १ कोटी ८० लाख, तर निम्नदुधना प्रकल्पात अशी योजना राबविण्यासाठी १ कोटी १३ लाख रुपये खर्च करावे लागतील, असे अभिप्राय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जाफराबाद व भोकरदन तालुक्यांतील काही गावांना पाणीपुरवठा करणे अशक्य ठरू लागल्याने खडकपूर्णा प्रकल्पात ३० बाय ४५ बाय ८ मीटरचे चर खणले जाणार आहेत. हनुमंतखेडानजीक हा प्रयोग हाती घेतला जाणार आहे. निम्नदुधना प्रकल्पात अशा पद्धतीचा प्रयोग केल्यास २०२ टँकरने पाणीपुरवठा करता येऊ शकेल, असा प्रस्ताव पाठविला आहे. अशा पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याची आवश्यकता आहे. चर खणून त्यातील पाणी टँकरने पुरवण्याची योजना परतूर तालुक्यात सुरू केली होती. याच तालुक्यात जॅकवेलपासून २ किलोमीटर अंतरावर चर खणले जाणार आहे.
रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला असता तर त्यापेक्षा अधिक खर्च झाला असता, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. रेल्वे वाघिणीने एका वेळी २८ लाख लीटर पाणी आणता आले असते. १२० दिवस रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्यास ६ कोटी ६७ लाख रुपये खर्च झाले असते. तुलनेने नदीपात्रात चर घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे काटकसरीचे असल्याचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तयार केला. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने टंचाईचे प्रस्तावही वाढू लागले आहेत. अशा पद्धतीचे प्रयोग यापूर्वी कधीही करण्यात आले नव्हते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांसाठीही असे प्रयोग नावीन्यपूर्ण ठरत आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी तांत्रिक मान्यता मिळविण्यात बराच वेळ खर्ची पडत असल्याने टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.