ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय देयके अनेक महिने वेतन पथकाकडून मंजुर केली जात नसल्याने त्यांची प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकांवर पुन्हा आजारी पडण्याची वेळ आली आहे. कित्येक महिन्यांपासून प्रलंबित राहिलेल्या वैद्यकीय देयकांची रक्कम शिक्षकांना त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेने केली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा आजारपणातील वैद्यकीय खर्च शासनाकडून दिला जातो. त्यासाठी उपचार घेतलेले रुग्णालय, सेवेत असणारी शाळा, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय असा प्रवास करून शिक्षकांच्या वैद्यकीय देयकांची फाईल सादर करावी लागते. ही फाईल सादर करताना शिक्षकांना अनेकांचे ‘समाधान’ करावे लागते. इतके दिव्य पार पाडून वेतन पथकापर्यंत पोहोचलेली फाईल वर्ष दोन वर्षांपासून मंजूर केली जात नसल्याचा आरोप महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव कुटे व कार्याध्यक्ष श्याम पाटील यांनी केला. मागील दीड ते दोन वर्षांपासून संबंधित पथकांकडे शिक्षकांची वैद्यकीय देयकांच्या फाईल पडून आहेत. वैद्यकीय देयकांची रक्कम मिळत नसल्याने शिक्षकांवर पुन्हा देयकांसाठीच आजारी पडण्याची वेळ आल्याचे संघटनेने म्हटले आहे. या प्रश्नाकडे शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी शासनाचे लक्ष वेधले. मार्च महिन्याच्या आत सर्व शिक्षकांचे वैद्यकीय देयके मंजूर न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.