अंबरनाथ शहरातील विम्को सोसायटीमधील प्रकाश नायर यांच्या बंगल्यात बुधवारी मध्यरात्री दरोडा पडला. नायर दुपारी कामानिमित्त परिवारासोबत मुंबईला गेले होते. नेमकी ही संधी साधून अज्ञात चोरटय़ांनी नायर यांच्या बंगल्याच्या खिडक्यांचे गज उचकटले आणि घरात प्रवेश केला. दरवाजांची तोडफोड करून सुमारे ६१ तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या वेळी बंगल्याचा राखणदार असलेल्या पाळीव कुत्र्यांवर चोरटय़ांनी गुंगीचे औषध फवारून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर बंगल्यात प्रवेश केला.
मुंबईला गेलेले नायर कुटुंबीय मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास परतले. त्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. नायर यांच्या बंगल्यात झुबो नावाचा लॅब्रेडॉर जातीचा पाळीव कुत्रा आहे. घरी कुणीही नसताना तो बंगल्याची राखण करतो. चोरटय़ांनी नेमके हे हेरले. त्यांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश करताना झुबोच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. कुत्रा बेशुद्ध होताच चोरटे बंगल्यात शिरले. नायर कुटुंबीय परतले असता त्यांना बंगल्याच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत असलेला कुत्रा आढळून आला. चोरी करण्याच्या पद्धतीवरून हे चोरटे सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरटय़ांनी घरातील इतर वस्तूंना धक्का पोहोचू न देता घरातील रोख रक्कम आणि दागिने असलेले कपाट फोडले आहे. या कपाटातील खोटे दागिने मात्र जसेच्या तसे ठेवून फक्त खरे दागिने घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला. नायर यांच्या घराची इत्थंभूत माहिती असलेला कोणीतरी चोरटा यामध्ये सहभागी असण्याची शंका पोलिसांना आहे. याप्रकरणी नायर यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस उपायुक्त वसंत जाधव, सहा. पोलीस आयुक्त माणिक बाखरे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गावडे यांच्यासह डॉग स्क्वॉड आणि फिंगर प्रिंट तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी तपासणी केली आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या वतीने प्रयत्न केले जात असून, गुन्हेगारांना लवकर शोधून अटक केली जाईल असे, पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी सांगितले.