महात्मा गांधी जयंती निमित्त नाशिक भारत स्काऊट्स आणि गाईडस् यांच्यातर्फे बुधवारी सकाळी दहा हजार विद्यार्थ्यांचा ‘एकसूर एकताल’ या समूहगीत, गायन व लयबद्ध नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी दहा वाजता महाराष्ट्र पोलीस अकादमी समोरील मैदानावर हा कार्यक्रम होईल. नाशिक भारत स्काऊटस् आणि गाईड््स जिल्हा संस्थेच्या पुढाकाराने आयोजिलेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभागाचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमासाठी १०० संगीत शिक्षकांनी महिनाभरापासून स्काऊटस्, गाईडस् व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त यावेळी सर्वाना अहिंसेची शपथ दिली जाणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, आ. डॉ. सुधीर तांबे, प्रशांत हिरे, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्काऊटचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी एन. बी. औताडे यांनी केले आहे.