जागतिकीरकरण, वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, अस्थिर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती आणि आजचा सुजाण पण आपल्या मागण्यांबद्दल आग्रही असणारे ग्राहक या सगळ्या गोष्टींचा विचार करता ‘कॉर्पोरेट नेतृत्त्वा’ची संकल्पना बदलते आहे आणि त्याचे महत्वही आजघडीला वाढते आहे, असे मत ‘वुई स्कूल’चे विपणन प्रमुख प्रा. समीर कारखानीस यांनी ‘अकॅडमी एक्सलन्स २०१५’ या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
‘मॅनेजमेंट पॅराडाईज डॉट कॉम’ आणि ‘एल. एन. वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च’ (वुई स्कूल) यांनी २८ ते ३० एप्रिल दरम्यान ‘अ‍ॅकडमी एक्सेलन्स अ‍ॅवॉर्ड २०१५’ चे आयोजन केले होते. मुंबईतील शंभर वेगवेगळ्या व्यवस्थापकीय शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘मॅनेजमेंट पॅराडाईज डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक रायचुरा यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. स्वत: व्यवस्थापन विषयातील पदवीधर असलेल्या आणि ‘वुई स्कूल’चे माजी विद्यार्थी असलेल्या रायचुरा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र सांगितला. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून मोठय़ा यशाची तयारी होत असते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाला अभिनेता अंजन श्रीवास्तव, इक्बाल खान, विनता नंदा, भावना पणी, हर्ष सचदेव, विनोद गणात्रा, कुंवर अमरजीत सिंग, पूजा घई, विनोद पांडे, विपुल गोयल आणि फराज काझी असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.