तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाच्या जागेबाबत घडला आहे. एखादी दुर्घटना घडल्यावर या यंत्रणेची शासनाला आठवण होते. मग या यंत्रणेला जागा देण्याचा मुद्दा चर्चेत येतो. पण ते तेवढय़ापुरतेच राहाते. काही दिवस गेले की पुन्हा सारे काही थंड होते. सध्या तरी या यंत्रणेने मुंबईत तात्पुरत्या स्वरूपात आपला संसार थाटला आहे.
मुंब्रा येथील लकी कपाऊंडमध्ये इमारत कोसळल्यावर राष्ट्रीय आपत्ती बचाव दलास पुण्याजवळील तळेगाव येथून पाचारण करण्यात आले होते. तेव्हा वाहतुकीचा फटका बसल्याने या यंत्रणेस घटनास्थळी पोहचण्यास बराच उशीर झाला होता. मुंबईतील अनेक धोकादायक इमारती लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती बचाव दलास मुंबईत जागा उपलब्ध करून द्यावी, असा आदेश गेल्या मे महिन्यात पावसाळापूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. मुंबई महानगरपालिकेने दोन जागा या यंत्रणेस दाखविल्या. पण या दोन्ही जागांना मूर्त स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. परिणामी या यंत्रणेच्या ६५ जणांच्या पथकाकरिता अंधेरीतील शहारीराजे क्रीडा संकुलात तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्यात आली आहे.
इमारत कोसळल्यावर या यंत्रणेच्या माध्यमातून आत अडकलेल्यांचा विशेष उपकरणाच्या माध्यमातून शोध घेतला जातो. या यंत्रणेकडे असलेली उपकरणे खड्डे खणून आत सोडली जातात. आत अडकलेल्याच्या श्वासोच्छवासाचा वेध ही उपकरणे घेऊ शकतात. माहीममधील अल्ताफ मॅन्शनमधील काही जणांना अशाच प्रकार वाचविण्यात आले होते. या यंत्रणेकडील श्वानपथक ढिगाऱ्यात अडकलेल्यांचा ठावठिकाणा लावण्याचे काम करते. या पाश्र्वभूमीवर मुंबईत या दलाला कायमस्वरूपी जागा देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. डॉकयार्ड परिसरातील इमारत सकाळी कोसळल्यावर या यंत्रणेचे पथक तात्काळ दाखल झाले. तरीही आणखी दोन तुकडय़ा तळेगावमधून मागवून घ्यावा लागल्या. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एनएसजीचे कमांडो मुंबईत येण्यास बराच विलंब लागला होता. याचा बोध घेऊन केंद्र सरकारने मुंबईत एनएसजीचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही जागेचा मुद्दा पुढे आला होता. एनएसजी कमांडोंना सरावासाठी अधिक जागा लागते. केंद्र सरकारच्या दट्टय़ानंतर राज्य सरकारने एनएसजीला जागा उपलब्ध करून दिली. राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाला असा कायमस्वरूपी पत्ता कधी मिळतो ते आता पाहायचे!